निधी खर्च करूनही पाण्यासाठी भटकंती सुरूच
By admin | Published: April 27, 2017 06:07 PM2017-04-27T18:07:56+5:302017-04-27T18:07:56+5:30
2008 पासून नळपाणीपुरवठा योजनेसाठी दिलेला लाखो रूपयांचा निधी कुचकामी ठरला आह़े
ऑनलाइन लोकमत
धडगाव, जि. नंदुरबार, दि. 27 - धडगाव तालुक्यातील उमराणी खुर्द आणि उमराणी बुद्रुक या दोन गावांना 2008 पासून नळपाणीपुरवठा योजनेसाठी दिलेला लाखो रूपयांचा निधी कुचकामी ठरला आह़े या निधीतून योजनाच पूर्ण न झाल्याने नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत़
पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली गावात केवळ एक पाण्याचा जलकुंभ बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आह़े गेल्या 10 वर्षापासून पडून असलेला हा जलकुंभ जीर्ण झाला असून कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आह़े गावाच्या पाणी योजनेसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचे नेमके झाले तरी काय? असा सवाल दोन्ही गावांकडून उपस्थित करण्यात आला आह़े पाणीपुरवठा योजनेत अपहार झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांचा असून या योजनेसाठी करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी धडगाव तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आह़े
दोन्ही गावांना पाच लाख रूपयांचा खर्च
उमराणी खुर्द येथील नळ पाणी पुरवठा योजनेला स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून 2005 मध्ये प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती़ यासाठी ग्रामसभेने दिलेल्या ठरावानुसार मंजूरी देण्यात येऊन या योजनेसाठी 12 लाख 84 हजार 556 रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ हा निधी मिळाल्यानंतर 29 मार्च 2008 मध्ये ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती धनाजे बुद्रुक ता़धडगाव यांचे अध्यक्ष यांना उमराणी खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी पाच लाख 49 हजार 148 रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला़ यानंतर याठिकाणी चार खांबांवर उभ्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आल़े त्यानंतर हे काम बंद करण्यात आले ते आजवर बंद आह़े
हीच गत उमराणी खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेची आह़े याठिकाणी 2006-2007 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी 12 लाख 52 हजार 531 रूपयांना मंजूरी देण्यात आली होती़ ही रक्कम ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती धनाजे बुद्रुक यांना देण्यात आली असून या योजनेवर पाच लाख 78 हजार 205 रूपयाचा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
उमराणी खुर्द येथे पाच लाख रूपयांचा निधी खर्च करून कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा नळपाणी योजनेचे काम करण्यात आलेले नाही़ दोन्ही ठिकाणी रक्कम खर्च न करताच काढून घेण्यात आल्याचे दिसून आल्यानंतरही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही़ या योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी जगदीश पावरा, राजेंद्र पावरा, अमरसिंग पावरा, जितेंद्र पावरा, रामदास पावरा यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्ष:या आहेत़ दोन्ही गावांमध्ये साधारण 11 लाख रूपयांर्पयत खर्च करूनही पाण्यासाठी ग्रामस्थ वणवण भटकत आहेत़
उमराणी खुर्द आणि बुद्रुक या दोन गावांमध्ये पाणी योजनांची योग्य प्रकारे चौकशी होऊन योजना सुरू व्हावी, यासाठी गेल्या 10 वर्षापासून संघर्ष सुरू आह़े प्रशासन कारवाई करत नसल्याने समस्या वाढीस लागत आहेत़ जिल्हा परिषदेने या योजनेची चौकशी करावी़
-जगदीश एल पावरा, ग्रामस्थ, उमराणी बुद्रुक ता़ धडगाव़