अखेर दामिनी पथक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:22 PM2019-12-03T12:22:15+5:302019-12-03T12:22:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखेर नंदुरबार पोलिसांना जाग आल्यानंतर टारगट युवक आणि रोडरोमियोंवर कारवाईसाठी दामिनी पथक आणि साध्या ...

Eventually the damini squad landed on the road | अखेर दामिनी पथक उतरले रस्त्यावर

अखेर दामिनी पथक उतरले रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अखेर नंदुरबार पोलिसांना जाग आल्यानंतर टारगट युवक आणि रोडरोमियोंवर कारवाईसाठी दामिनी पथक आणि साध्या वेशातील पोलिसांचे पथक रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहरातील विविध चौकात दिसून आले. अनेक ठिकाणी युवकांना पिटाळून लावण्यात आले तर काही जणांना तंबी देवून सोडून देण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने शनिवार, 30 नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.
शहरातील चौकाचौकात आणि शाळा, महाविद्यालय परिसर, खाजगी क्लास परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून टारगट युवक आणि रोडरोमियोंनी उच्छाद मांडला होता. महिला, तरुणी, विद्यार्थीनी यांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. पालकांनी शाळा व्यवस्थापनांकडे तक्रारी करून व शाळांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे अशा युवकांचे फावले होते. याबाबत ‘लोकमत’ने शनिवार, 30 नोव्हेंबरच्या अंकात यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. 
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याची गांभिर्याने दखल घेत  शहर पोलिसांना सक्तीने कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दामिनी पथक, साध्या वेशातील पोलिसांचे पथक कार्यान्वीत करण्यात आले आहे. याशिवाय वाहतूक पोलिसांना अशा टारगट युवकांच्या वाहनांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्याचा परिणाम सोमवारी दिसून आला. 
दामिनी पथकाचे वाहन    सकाळी दहा ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री सात वाजेर्पयत गस्त घालतांना दिसून आले. याशिवाय या पथकांनी अनेक चौकातील टारगट युवकांना पिटाळून लावले. काहींना ताब्यात घेवून तंबी देत सोडून दिले. 
वाहतूक पोलिसांनी देखील टारगट युवकांच्या दुचाकींवर थेट कारवाई केल्याचे चित्र दिनदयाल चौक, पालिका चौक, मोठा मारुती मंदीर परिसर, नेहरू चौक, मिशन विद्यालय परिसर या ठिकाणी दिसून आले. यामुळे अशा युवकांवर जरब बसली आहे. 
पोलिसांनी या कारवाईत   सातत्य ठेवावे अशी अपेक्षा पालक आणि शाळा व्यवस्थापनांकडून होत आहे.    

टारगट युवकांवर कारवाई नंतर काही दिवसांनी हे युवक पुन्हा त्याच वाटेला जातात. त्यामुळे अशा युवकांवर कारवाई करतांना त्यांच्या पालकांवरही ती झाली पाहिजे. जेणेकरून युवक पुन्हा त्या वाटेला जाणार नाहीत. अशा प्रतिक्रिया काही शाळांनी व्यक्त केल्या.    
 

Web Title: Eventually the damini squad landed on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.