समाज बळकटीसाठी सर्वांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:46 PM2020-11-23T12:46:26+5:302020-11-23T12:46:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : समाज बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून समाजाने तयार केलेले नियम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : समाज बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून समाजाने तयार केलेले नियम सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आदर्श समाजाची निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन लेवा पाटीदार गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी प्रकाशा, ता.शहादा येथे केले.
प्रकाशा येथील सदगुरु दगा बापूजी धर्मशाळेत रविवारी लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन झाले. या अधिवेशनात समाजहिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले. अध्यक्षस्थानी लेवा पाटीदार गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील होते. या वेळी महिला आघाडीच्या कमलताई पाटील, विमलबाई करसन चौधरी, जयश्री दीपक पाटील, माधवी मकरंद पाटील, मंगला मोहन चौधरी, डॉ.सविता अनिल पाटील, मोहन काशिनाथ चौधरी, सुनील सखाराम पाटील, जगदीश पटेल, भरत सुदाम पटेल, डॉ.सतीश चौधरी, दीपकननाथ एकनाथ पाटील, दशरथ विठ्ठल पाटील, शिवदास चौधरी, किशोर रतन पटेल, डॉ.लतेश चौधरी, सुनील श्रीपत पटेल, गोविंद पुरुषोत्तम पाटील, सुभाष सुदाम पाटील, डॉ.प्रशांत गिरधर पाटील, रवींद्र शंकर पाटील, दिलीप पाटील, राकेश सुभाष पाटील, शितल हितांशू पटेल, हरी दत्तू पाटील, दिलीप दगडू पाटील, रवींद्र हांडू गुजर, राजाराम पाटील, विजय विठ्ठल पाटील, जयप्रकाश पाटील, डॉ.वसंत चौधरी, डॉ.दिलीप पटेल, जगदीश पाटील, मयूर पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी कुलस्वामिनी अन्नपूर्णा माता, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व स्व. पी.के. अण्णा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करुन वार्षिक अधिवेशनास सुरुवात झाली.
या वेळी दीपक पाटील म्हणाले की, समाजात समानता ठेवली पाहिजे, समानता ठेवली तर सगळ्यांचे कल्याण होईल. स्व. पी.के. अण्णांनी सर्वांना सोबत घेऊन समाजकार्य करावे असे सांगितले होते. गुजर समाज हा शेतीप्रधान समाज आहे. समाजातील संघटन बळकट करून शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली द्याव्यात. समाजातील तरुण मुला-मुलींनी आधुनिक युगात विविध क्षेत्रात कार्य करावे. समाजाने केलेले नियम हे सर्वांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे. समाजहितासाठी राजकारण न करता कोण कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा समाजाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे सांगितले. डॉ.वसंत चौधरी (करजकुपा), गणेश पाटील (शहादा), श्रुतिका शिरीष पाटील (विद्याविहार), मयुरी राजेंद्र पाटील (बिलाडी बामखेडा), हेमलता पाटील (पुणे), प्रकाश पाटील (शहादा), मोनालिसा पाटील (खेडदिगर), सुदाम पाटील (कोळदा), जगदीश पटेल (निझर) यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनील पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडींग वाचन केले.
गुणवंतांचा सत्कार
या वेळी विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या समाजातील युवक युवती व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात विद्याविहार येथील श्रुतिका शिरीष पाटील हिने जनजागरण वकृत्व स्पर्धेत राज्यस्तरावर सहभाग नोंदवला. निझर येथील हेतल जगदीश पटेल हिने निबंध स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर प्राविण्य प्राप्त केले. परिवर्धे येथील किमांशु दीपक पाटील (ह.मु.नवसारी) याने इंडो नेपाल कबड्डी संघ नेपाल येथे गोल्ड मेडल पटकावले. व्यावल येथील आयुष चेतन पटेल (ह.मु.सुरत) याने नीट या परीक्षेत ६१५ गुण मिळवून उत्तीर्ण झाला. गुजरखर्दे येथील हेमकांत दत्तू गुजर याने बी.ई. मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. बामखेडा येथील डॉ.प्रमोद जाधव पाटील यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. विद्याविहार येथील अमेय किरण पटेल हा आयआयटीमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. बामखेडा येथील स्वाती गणेश पाटील यांनी कोरोना महामारीत सासूची सेवा आईप्रमाणे केली व सासूच्या निधनानंतर अग्निडाग दिला. सुलवाडे येथील युवराज हिरालाल पाटील, प्रकाशा येथील मोहन काशिनाथ चौधरी, भरुच येथील मोहन गिरधर पाटील यांची अखिल भारतीय गुर्जर महासभच्या विविध पदांवर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. दीपक पाटील यांची अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहन चौधरी व समस्त लेवा पाटीदार गुजर समाजातर्फे सत्कार करण्यात आला. वार्षिक अधिवेशनात आलेल्या सर्व समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था सुलवाडा, ता.शहादा येथील युवराज हिरालाल पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.