जिल्ह्यातील ईव्हीएम मशिन अहमदनगरसाठी झाले रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:01 PM2021-01-07T13:01:25+5:302021-01-07T13:01:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायती आणि सुमारे सहा प्रभाग बिनविरोध झाले आहेत. यातून मतदान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायती आणि सुमारे सहा प्रभाग बिनविरोध झाले आहेत. यातून मतदान केंद्रांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाचा ताण कमी झाला होता. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातून अडीच हजार ईव्हीएम अहमदनगर जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाकडून ही यंत्रे रवाना करण्यात येत आहेत.
जिल्हा प्रशासनाकडे एकूण तीन हजार ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने मशीनचा वापर होणार असल्याने प्रशासनाकडून त्यांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे सुरू होती. या कामांना गती देण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाने जिल्ह्यातून मशीन्स दुसऱ्या जिल्ह्यात रवाना करण्यात येणार असल्याने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी या मशीन्स पाठवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण बॅलेट युनिटच्या वाहतुकीसाठी यंदा प्रथमच एसटीच्या मालवाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यात आला. नंदुरबार आगारातील चार बसेसचा यासाठी वापर करण्यात आला आहे. यापूर्वी ही वाहतूक खाजगी मालवाहतूकदाराकडून करण्यात येत होती. परंतु यंदा प्रथमच एसटीच्या मालवाहतूक सेवेचा वापर करण्यात आल्याने एसटीच्या मालवाहतूक विभागाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.
येत्या काळात जिल्ह्यात साडेतीनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम असल्याने सुरू असलेल्या निवडणुका आटोपल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात मशीन्स मागविण्यात येतील असा अंदाज आहे. दरम्यान प्रशासनाला गरजेच्या असलेल्या ईव्हीएम मशीन्स तयार करून त्या तालुकास्तरावर रवाना करण्याचे कामकाजही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत तहसील कार्यालयात हे मशीन्स पोहोचून त्याठिकाणी पुढील कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे समजते.