निकालाची उत्सूकता व जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:29 PM2020-01-09T12:29:29+5:302020-01-09T12:29:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट आणि २० गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी मतमोजणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट आणि २० गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी मतमोजणी घेण्यात आली़ उत्सुकतापूर्ण अशा या निकालाला ऐकण्यासाठी तालुक्याच्या विविध भागातून राजकीय पक्षांचे समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवार सकाळी ९ वाजेपासून खामगाव रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात हजर होते़ निकालाच्या घोषणेनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी केलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला होता़
जिल्हा क्रीडा संकुलातील शूटींग रेंज परिसरात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुम परिसरातच ही मतमोजणी करण्यात आली़ यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक वान्मती सी़, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वसुमना पंत आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली़ १२ टेबलवर सुरु झालेल्या मतमोजणीत गटांसह गणांची मोजणी सुरु झाली होती़ सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात निवडणूकीचे निकाल घोषित होण्यास प्रारंभ झाला होता़
निकालांच्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ निकाल ऐकणाऱ्या समर्थकांना रस्त्यावरच रोखले होते़ परिसरात केवळ उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात आला होता़ सकाळी साडेदहा वाजेपासून गट आणि गणांचे अनुक्रमांकाने निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवार आनंदात बाहेर येत होते़ त्यांच्याकडून विजयाची खूण केल्यानंतर संकुलाच्या प्रवेशद्वाराबाहेर उभ्या असलेल्या समर्थकांकडून एकच जल्लोष करुन गुलालाची उधळण सुरु करण्यात येत होती़ यातून संकुलाबाहेरील रस्ताही लाल झाल्याचे दिसून आले़ दुपारी २ वाजेपर्यंत निकाल घोषित होणे सुरु असल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते़ एकीकडे समर्थकांची या भागात गर्दी असताना दुसरीकडे मात्र प्रमुख नेते आपआपल्या घरुनच निकाल ऐकून घेत असल्याचे दिसून आले़ निवडणूक निकालांची घोषणा होणा असल्याने या भागात फुलमाळा विक्रेतेही सकाळपासून दाखल झाले होते़
जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसºया बाजूला असलेल्या टेकडीच्या उतारावर उन्हात शेकडो कार्यकर्ते बसून होते़ यातील काहीजण रस्त्यावर आल्यानंतर प्रवेशद्वारातून बाहेर पडणारे आणि निकाल ऐकणारे यांची गर्दी होऊन पायी चालणेही मुश्किल होत होते़ यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत हे संकुलाच्या आवारात होते़ त्यांनी समर्थकांना समज देत रस्त्याच्या दुसºया बाजूला केले़ यानंतर बºयाच जणांनी टेकडीच्या उतारावर मिळेल ती जागा पटकावून तेथूनच निकाल ऐकला़
कोपर्ली गटातून विजयी झालेले शिवसेनेचे अॅड़ राम रघुवंशी यांच्या विजयानंतर शहरातील आमदार कार्यालय परिसरातून त्यांची विजयी रॅली काढण्यात आली़ याठिकाणी डिजे लावून कार्यकर्ते जल्लोष करत गुलालाची उधळण करत होते़
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदिनी गावीत ह्या कोठली गटातून विजयी झाल्या़ त्या संकुलात उपस्थित होत्या़ त्यांच्यासोबत खासदार डॉ़ हीना गावीत यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होते़ गावीत परिवरातील सर्व विजयी उमेदवारांनी याठिकाणी उपस्थिती दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला़ कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली़
नियोजनाच्या अभावामुळे मतमोजणीत झाली दिरंगाई
मतमोजणीच्या ठिकाणी कुठलेही नियोजन नसल्यामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाºयांचे नियंत्रण नसल्यामुळे मतमोजणी प्रतिनिधी, मिडिया प्रतिनिधी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. निकालाची आकडेवारी देखील अचूक मिळत नव्हती. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अंतिम आकडेवारी तयार करण्यासाठी प्रशासनाची लगबग दिसून आली. यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील नाराजी व्यक्त केली. सर्वाधिक गट व गण असलेल्या शहादा तालुक्यात दुपारीच सर्व आकडेवारी स्पष्ट झाली. शिवाय इतर तालुक्यातील निकाल आणि आकडेवारी देखील स्पष्ट झाली असतांना नंदुरबार मात्र मागेच राहिले. तीन गटांची फेरमतमोजणी केल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले असले तरी इतर सातही गटांची आकडेवारीबाबत मात्र बोंबच होती.
पोलिसांना अपमानास्पद वागणुकीमुळे बहिष्कार
मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांना देखील हिन वागणूक देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी जेवणावर बहिष्कार टाकला. प्रचंड गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना तेथे धाव घ्यावी लागली. त्यांनी कर्मचाºयांचे म्हणने ऐकले. कर्मचाºयांनी आमच्या हातातून जेवनाचे ताट हिसकवून घेतल्याचे सांगितले. शिवाय प्रशासनाकडे योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे सांगितल्याने पोलीस अधीक्षक संतापले. त्यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकाºयांना विचारणा केली. अखेर त्यांच्या मध्यस्थीने पोलिसांनी बहिष्कार मागे घेतला.
मतमोजणीची जागा गैरसोयीची, कार्यकर्ते हैराण...
मतमोजणीचे ठिकाणही अगदीच कोपºया अर्थात जिल्हा क्रिडा संकुलात ठेवण्यात आले. या ठिकाणी जाण्यासाठी व येण्यासाठी एकच अरूंद रस्ता आहे. तेथेच तालुक्यातून आलेल्या नागरिकांनी आपली वाहने लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली. वास्तविक शहरात इतर ठिकाणी योग्य जागा असतांनाही निवडणूक अधिकाºयांनी एवढी कोपºयाची जागा निवडण्याचे कारण काय? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहने उभे करण्यात अडचणी असल्यामुळे रस्त्यावरच वाहने लावण्यात आली. परिणामी अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांचा मारही खावा लागला. हे सर्व केवळ गैरसोयीची जागा निवडल्याने कार्यकर्ते, पोलीस आणि इतरांना सोसावे लागले.