कार्यक्षेत्रातील कामातून सूट द्यावी अन्यथा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 12:45 PM2020-12-03T12:45:49+5:302020-12-03T12:45:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करुन काम करीत आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करुन काम करीत आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवर या कामाला महत्व नसल्याचे समोर आले आहे. यामुळे कोरोनाचे कामाचे आदेश देतांना कार्यक्षेत्रातील नियमित कामांतून सुट मिळावी अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांना निवेदन दिले. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यानंतर राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. यांनतर कोविड कामांना प्राधान्य देण्यात आले. यामुळे सर्व आरोग्य कर्मचार्यांना कोविड कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोग्य कर्मचारी दिवसरात्र कामे केले. कर्मचार्यांना पुन्हा कार्यक्षेत्राबाहेरील कामांसाठी जुंपण्यात येण्याची शक्यता कर्मचा-यांनी व्यक्त केली.
कर्मचा-यांना कोरोनाचे काम करीत असतांना कार्यक्षेत्रातील कामातून सुट मिळावी, कोविड कर्तव्यासाठी जातांना वैद्यकिय अधिकारी यांनी कार्यमुक्त करावे व येतांना पुन्हा कामावर हजर करुन घ्यावे. कोविड कार्य करीत असतांना कार्यक्षेत्रात साथ उद्भवल्यास किंवा काही विपरीत घडल्यास आरोग्य कर्मचार्यांना जबाबदार धरण्यात येवू नये.
आरोग्य कर्मचार्यांना सुरक्षा साधने अर्थात एन-९५ मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड, ग्लोव्हज् आदि सुरक्षा साधने पुरवठा कार्यालयामार्फत पुरविण्यात यावीत आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॅा.भारूड यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यात आरोग्य कर्मचार्यांच्या सिंहाचा वाटा आहे. वरिष्ठ पातळीवर या कामांची माहिती देण्यासाठी लक्ष घालून स्वतः वरिष्ठांशी बोलणार आहे. कोरोना कामांना केंद्र व राज्य शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचार्यांची सेवा महत्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.