‘यंग ब्रिगेड’ कडून जिल्हा परिषदेला अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:44 AM2020-01-10T11:44:34+5:302020-01-10T11:44:41+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकविसीच्या जिल्हा परिषदेत तिशीची तरुणाई अर्थात ‘यंग ब्रिगेड’ या पंचवार्षीकला भाव ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकविसीच्या जिल्हा परिषदेत तिशीची तरुणाई अर्थात ‘यंग ब्रिगेड’ या पंचवार्षीकला भाव खावून जाणार आहे. ५६ पैकी तब्बल १९ सदस्य हे तिशीच्या घरातील आहेत. तरुणाईची ही फौज जिल्हा विकासात मोलाची भर घालण्यासाठी अभ्यासपूर्ण कामकाज जिल्हा परिषदेत करेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद स्थापन होऊन २१ वर्ष झाले आहेत. २१ वर्षातील ही पाचवी निवडणूक आहे. आतापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत अनेक ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या कार्यक्षमतेने जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभाग घेत जिल्हा विकासात मोलाची भर घातली आहे. यंदाच्या निवडणुकीत ७० टक्के निवडून आलेले सदस्य हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची पायरी चढणार आहेत. त्यात ३५ टक्के सदस्य हे अवघ्या ३० ते ३५ वयाचे आहेत. आता या सदस्यांकडून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.
तरुण व उच्च शिक्षीत देखील
जिल्हा परिषदेत जे तरूण सदस्य निवडून आले आहेत त्यापैकी ९० टक्के सदस्य हे उच्च शिक्षीत आहेत. किमान पदवीपर्यंतचे शिक्षण काहींनी घेतलेले आहे. त्यामुळे तरुण आणि शिक्षण त्यात राजकारण असा त्रिवेणी संगम या सदस्यांच्या बाबतीत असून त्यांचा त्या त्या क्षेत्रातील अभ्यास जिल्हा परिषद चालवितांना संबधीत सत्ताधारींना मोलाची मदत करणारा ठरणार आहे.
हे आहेत तरुण सदस्य
निवडून आलेल्या तरूण सदस्यांमध्ये कोपर्ली गटातील अॅड.राम रघुवंशी, उमराण गटातील अजीत नाईक, भरडू गटातील मधुकर नाईक, रायसिंगपूर गटातील शंकर पाडवी, तोरणमाळ गटातील गणेश पराडके, नांदर्खे गटातील अर्चना गावीत, अमोणी गटातील अॅड.सिमा वळवी, धानोरा गटातील राजश्री गावीत, म्हसावद गटातील अभिजीत पाटील, आष्टे गटातील देवमन पवार, सुलतानपूर गटातील कविता पावरा, खेडदिगर गटातील वंदना पटले, मोहिदेतर्फे शहादा गटातील जिजाबाई ठाकरे, खापर गटातील भूषण कामे, आमलाड गटातील पार्वती गावीत, अक्कलकुवा गटातील कपील चौधरी, गंगापूर गटातील जितेंद्र पाडवी, रोषमाळ खुर्द गटातील संगिता पावरा आणि बोरद गटातील सुनिता पवार यांचा समावेश करता येईल.
अनेकांना राजकीय पार्श्वभूमी
निवडून आलेल्या या तरुण सदस्यांपैकी अनेकांना राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. कुणाचे वडील, कुणाचे आजोबा, कुणाचे काका तर कुणाचे काका हे राजकारणातील सक्रीय नेते आहेत. तर काहींना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना निवडून आलेले आहेत.
राजकीय पार्श्वभूमी असो किंवा नसो, परंतु तरुणाईचे सळसळते रक्त आता विकास कामांमध्ये सहभाग घेणार आहे. ग्रामिण भागातील प्रश्न मांडणार आहे. जे प्रश्न समजणार नाही ते समजून घेत सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या यंग ब्रिगेडकरून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.
जिल्हा परिषदेत अनेकजण प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना ग्रामविकासाच्या योजना, जिल्हा परिषदेचे कामकाज याची माहिती देण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे अपेक्षीत आहे. तसे झाल्यास त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभाग घेता येईल. गेल्या काही पंचवार्षिकमधील सदस्यांना कामकाजाची माहिती, योजनांची माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहात कुणी फारसे प्रश्न उपस्थित करीत नव्हते. परिणामी नेहमीचेच चेहरे प्रश्न उपस्थित करीत असल्याचे दिसून येत होते. यावेळी तसे होऊ नये, सर्वच सदस्यांनी विशेषत: तरुण सदस्यांनी कामकाजात सहभाग घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अशा सदस्यांना प्रशिक्षण करणे आवश्यक आहे.