दुर्गम भागातही जि.प.अध्यक्षपदाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:56 PM2020-01-11T12:56:49+5:302020-01-11T12:57:03+5:30
शरद पाडवी । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुक निकालात सत्ता स्थापनेसाठी नेमकी दिशा मिळत नसली तरी ...
शरद पाडवी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुक निकालात सत्ता स्थापनेसाठी नेमकी दिशा मिळत नसली तरी सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सेनेला महत्व दिल्यास जि.प. अध्यक्षपदासाठी दुर्गम भागातील सेनेच्या दिग्गजांचाही विचार करावा लागेल, तर सत्ता कॉँग्रेसकडे झुकल्यास कॉँग्रेसमधील दिग्गज तथा अनुभवींचा अध्यक्षपदासाठी विश्वासात घेण्याची अपेक्षा दुर्गम भागात व्यक्त होत आहे.
नंदुरबार जिल्हा राजकारणात वेगळा ठसा उमटणाऱ्या धडगाव व मोलगी परिसरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रंगतदार ठरली. प्रदेश पातळीवर कॉँग्रेस व शिवसेन एकत्र असले तरी तो धर्म सातपुड्यात पाळला जात नाही. राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीला फाटा देत सातपुड्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे राहिले असून ही लढत याच दोन पक्षांमध्ये झाली. या दोन पक्षांशिवाय सातपुड्यात भाजपाचाही अंश दिसून आला. तिन्ही पक्षांकडून विजयासाठी नेटाने प्रचार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या सात गटांसाठी निवडणूक पार पडली. त्यात कॉँग्रेसला चार तर शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. जिल्हा परिषदेत नेहमीच लक्षवेधी मुद्दा उपस्थित करणारे तथा कॉँग्रेसचे दिग्गज रतन पाडवी यांनी कात्री गटातून दोन हजार १३८ मतांनी निवडून आले. याशिवाय कॉँग्रेसचे निष्ठावान तथा ज्येष्ठ पदाधिकारी जान्या पाडवी हे राजबर्डी गटातून निवडून आले, जान्या पाडवी यांच्या विजयाने राजबर्डी, शेलकुवी, शिकल्टी, रोंदलपाडा व धनाजे या भागात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या निकालात धडगाव तालुक्यात शिवसेना चार, कॉँग्रेस चार असे पक्षीय बलाबल राहिले आहे.
शिवसेनेच्या तिन्ही विजयी उमेदवारांपैकी विजय पराडके हे राजकारणात मुरलेले असून त्यांना राजकीय रणनितीचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या भूमिकेला जिल्हा राजकारणात महत्वाचे स्थान आहे. गणेश पराडके हे केवळ राकीयच नव्हे तर सामाजिक चळवळीशी देखील जुळलेले आहे. त्यांनी बलाढ्य उमेदवाराचा पराभव केला. तर रवींद्र पराडके हे जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्तीस कारणीभूत ठरणारे असून त्यांच्या भूमिकेलाही महत्व दिले जाते. सत्ता स्थापनेत सेना निर्णायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सातपुड्यातील सेनेच्या या तिन्ही विजयी उमेदवारांना समोर करीत जि. प.मध्ये अध्यक्षपदाचा दावा केला जात आहे. जिल्हा परिषद कॉँग्रेसच्या बाजूने झुकल्यास सातपुड्याच्या राजकारणातून चौथ्यांदा निवडून आलेले रतन पाडवी यांच्यासह हिराबाई रवींद्र पाडवी व सी. के.पाडवी यांनाही अध्यक्षपदासाठी विचारात घ्यावे, अशी अपेक्षा सातपुड्यातील जनतेची अपेक्षा आहे.
४कॉँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी असली येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत तोरणमाळ गटातूनच आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांना विजयी तथा निर्णायक मते मिळवून दिल्याचा दावा करीत सिताराम पावरा यांनी मुलाखतीत तोरणमाळ गटासाठी उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु उमेदवारी देण्यात पक्षश्रेष्ठींच्या नकारात्मक भूमिका दिसल्याने सिताराम पावरा हे मुलाखत कक्षातून तावातावात निघाले होते. उमेदवारी मिळत नसल्यामुळे त्यांनी थेट राष्टÑवादीचा आधार घेत तोरणमाळ गटात उमेदवारी केली. या लढतीत त्यांनी एक हजार ६०१ मते मिळवली. तर कॉँग्रेसच्या उमेदवार हेमलता पाडवी हे केवळ ४९० मतांनी पडले, त्यामुळे या गटात पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यानेच फटका दिल्याचे सांगितले जात आहे.
४धडगाव तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीत १४ पैकी शिवसेनेला सात, कॉँग्रेसला चार तर भाजपाला दोन जागा मिळवता आल्या. एक अपक्ष उमेदवार निवडूक आला, आहेत परंतु तो मुळ कॉँग्रेसचा उमेदवार आहे. त्यामुळे कॉँग्रेस गटाच्या पाच जागा होत आहे. उर्वरित दोन जागा भाजपाच्या आहेत. हे दोन्ही उमेदवार कॉँग्रेसकडे जाणार की शिवसेनेकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे दोन्ही उमेदवार पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी कॉँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, म्हणूनच शिवसेनेपाठोपाठ कॉँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी दावा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.