क्वॉरंटाईन सेंटरमध्ये सुविधा पुरविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:11 PM2020-07-05T12:11:47+5:302020-07-05T12:11:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रांमधील स्थिती आणि समस्या याबाबत ‘लोकमत’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रांमधील स्थिती आणि समस्या याबाबत ‘लोकमत’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने लागलीच उपाययोजना केल्या. तिन्ही इमारती सॅनिटाईज करण्यात आल्या तसेच पालिकेतर्फे स्वच्छता करण्यात आली.
क्वॉरंटाईन सेंटरमध्ये कारागृहातील यातना मिळत असल्याच्या तक्रारी येथे राहणाऱ्यांनी केल्या होत्या. शिवाय आरोग्य देखील धोक्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
याची दखल घेत ‘लोकमत’ने शनिवार, ४ जुलैच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने शनिवारी सकाळीच उपाययोजनांना सुरुवात केली. तिन्ही सेंटरच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. उघड्यावर पडलेला कचरा उचलण्यात आला. कचरा साठविण्यासाठी कचरा कुंडी ठेवण्यात आल्या.
इमारतीचा आतील व बाहेरील परिसर सॅनिटाईज करण्यात आला. ज्या सेंटरमध्ये पाण्याची समस्या होती तेथे टँकर मागवून ती दूर करण्यात आली. सेंटर मध्ये असलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जेवनाचा दर्जा देखील चांगला ठेवण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. तापी व नर्मदा या इमारतीच्या सेंटरमध्ये टीव्हीचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
क्वॉरंटाईन सेंटरमधील समस्यांची दखल घेऊन वृत्त प्रकाशित करून आमच्या समस्यांना वाचा फोडल्याने सुविधा निर्माण झाल्याची भावना येथे असलेल्या अनेकांनी ‘लोकमत’जवळ दूरध्वनीद्वारे व्यक्त केली.