खेतिया येथे ६१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:27 PM2020-07-24T12:27:48+5:302020-07-24T12:27:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर स्थित खेतिया येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून येथे आतापर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर स्थित खेतिया येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून येथे आतापर्यंत नऊ रुग्ण आढळले असून त्यापैकी एका ६१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू तर आठ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, खेतिया येथे नऊ कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एका पुरुषाचा मृत्यु झाला आहे. या रुग्णाचा कोरोना अहवाल १५ जुलै रोजी पॉझिटीव्ह आला होता व त्यांचा १९ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते. मृत्यूनंतर धुळे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
खेतियात आढळून आलेल्या रुग्णांवर नाशिक, इंदूर येथे उपचार सुरु आहेत. २२ जुलै रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालात एकाचवेळी खेतिया येथील तब्बल पाच महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातील तीन महिलांवर नाशिक, एका महिलेवर इंदूर तर एका महिलेवर सेंधवा येथे उपचार सुरु आहेत. प्रशासनाने पॉझिटीव्ह रुग्णांच्या घराजवळील भागाला कंटेनमेंट झोन तयार करून कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात आली असून नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. या वेळी प्रांताधिकारी सुमेरसिंह मुजाल्दा, तहसीलदार राकेश सस्तिया, नायब तहसीलदार जगन्नाथ वासकले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद किराडे, डॉ.राजेश ढोले, डॉ.अमन मोदी, डॉ.उमेश नावडे, चेतन ठाकूर, कुलदीप ठाकरे, मनू जैन, गुमानसिंह चौहान, रोहित सस्तिया, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर महाले, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक अजीज शेख, हे.कॉ.राजेंद्र बर्डे तसेच प्रशासन व आरोग्य विभागाची टीम उपस्थित होती. बडवानीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. सत्या, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिता सिंगारे व आरोग्य विभागाचे पथक लक्ष ठेवून उपाययोजना करीत आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर कोणीही पडू नये, तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जर कोणाला काही त्रास संभवत असेल तर त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे. तीन महिन्यात खेतिया व परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु आता रुग्ण आढळून येत असल्याने खेतिया शहरात खळबळ उडाली आहे.
नगरपरिषद खेतियाकडून ज्या ज्या परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तो परिसर स्वच्छ करुन सॅनिटाईज केले आहे. खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅबचे नमुने घेतले जात असून ते नमुने पुढे चाचणीसाठी इंदूर येथे पाठविण्यात येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नगरपालिकेतर्फे शहरात फवारणी केली जात आहे