कांदा दर वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:04 PM2019-12-10T12:04:44+5:302019-12-10T12:04:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेसहा हजारापर्यंत पोहोचले होते़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेसहा हजारापर्यंत पोहोचले होते़ यातून बाजारात कांदा तेजीत येऊन शेतकऱ्यांमध्ये आनंद असल्याचे चित्र निर्माण झाले होते़ परंतू प्रत्यक्षात एकदोन शेतकºयांना कांद्याचे चांगले दर देऊन उर्वरित चांगला कांदाही खराब असल्याचे कारण देत तो कमी दराने खरेदी करण्याचे प्रकार झाले आहेत़
यातून खराब असल्याच्या नावाने खरेदी केलेल्या कांद्याची किरकोळ बाजारात तेजीत विक्री करुन व्यापारी नफा कमावत असल्याचे चित्र सध्या येथे आहे़ याप्रकारामुळे शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून मालाला लिलाल पद्धतीने समान दर देण्याची मागणी केली आहे़
नंदुरबार बाजार समितीत सोमवारी बाजार सुरु झाल्यानंतर तब्बल साडेसहाशे कट्टे कांदा आवक झाली होती़ या कांद्याला १२ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर देण्यात आले होते़ यात काही माल कोरडा असल्याने त्याला ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर दिले गेले परंतू आकाराने लहान परंतू कोरडा आणि काहीशी काजळी असलेल्या मालाला थेट प्रतिकिलो १२ रुपयांपर्यंत दर देण्यात आला़ यातून शेतकºयांनी नाराजी व्यक्त करत योग्य त्या पद्धतीने पडताळणी करुन दर देण्याची मागणी केली आहे़
नंदुरबार बाजारात लिलाव पद्धतीने मालाची प्रतवारी तपासून खरेदी करणे रास्त असताना बाजार समितीचे व्यापारी कांद्याचा आकार आणि ओलाव्यानुसार दर ठरवून खरेदी व विक्रीचे व्यवहार करत आहेत़ यातून शेतकºयांचे नुकसान होत असून कांदा तेजीत असतानाही हाती अपेक्षित रक्कमच येत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़
नंदुरबारच्या किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये प्रतिकिलो दरांपर्यंत पोहोचला आहे़ यात सडका कांदाही ५० रुपयांच्या दरात मिळतो़ परंतू शेतकºयांकडून हाच कांदा १२ ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी खरेदी करुन त्यात सुधारणा करुन दुप्पट दराने किरकोळ विक्रेत्यांना देतात़ आधीच वाढीव दराने खरेदी केलेला कांदा वाढीव दरात विक्री करण्याची स्पर्धाच किरकोळ विक्रेत्यांमध्ये सुरु होते़ याप्रकारांकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालण्याची शेतकºयांची अपेक्षा आहे़