शेतकरी आत्महत्या आदिवासींमध्ये नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:59 AM2018-12-24T11:59:19+5:302018-12-24T11:59:23+5:30
जनजाती चेतना परिषद : समाजाचे धैर्य विषयावर केंद्रीय जनजाती आयोग अध्यक्षांचे मत
नंदुरबार : जनजाती समाजात धैर्य ठासून भरलेले आहे. त्यामुळेच आदिवासी समाजात शेतकरी आत्महत्या होत नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी येथे आयोजित जनजाती चेतना परिषदेत बोलतांना केले.
देवगिरी कल्याण आश्रमातर्फे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जनजाती चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेची सुरुवात दिनदयाल चौकातून निघालेल्या रॅलीने झाली. परिषदेत जनजाती बांधवांच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आले.
यावेळी मंचावर केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, भारतीय नौसेना आयुध सेवेतील लक्ष्मणराजसिंह मरकाम, अखिल भारतीय कल्याण आश्रमाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा नीलिमा पट्टे, सोलापूर येथील प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, नाशिक पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सचिव प्रा.शरद शेळके, विशाखापट्टणम येथील आयएएस अधिकारी शंकरसिंह, जनजाती मंचचे अध्यक्ष डॉ. राजकिशोर हलया, खासदार डॉ. हिना गावीत, आयोजन समिती अध्यक्ष डॉ.प्रकाश ठाकरे, आमदार उदेसिंग पाडवी, वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांताध्यक्ष चैत्राम पवार, प्रांत सहसचिव मोवल्या गावीत, गणेश गावीत, प्रा.पुष्पा गावीत, डॉ.विरेंन्द्र वळवी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना नंदकुमार साय म्हणाले, आजच्या युगात मणुष्य धैर्य ठेवत नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यात जनजाती समाजाचे लोक दिसणार नाहीत. धैर्य धर्माचे पहिले लक्षण आहे. प्रत्येक व्यक्तीत धैर्य ठासून भरलेले पाहिजे. समाजाला शिक्षित कसे केले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आदिवासी भागात शिक्षणाची काय परिस्थिती आहे याची माहिती मी घेत असतो. खेळामध्ये जर पदक मिळवायचे असतील तर या समाजाला पुढे आणले पाहिजे. सध्या देशापुढे राष्ट्रीय चारित्र्य हा मोठा प्रश्न आहे. जनजाती समाज हा राष्ट्राबरोबर कधीच धोका करू शकत नाही. देशात मुलींची भ्रृणहत्या मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. परंतु आदिवासी समाजात असे प्रकार कधीच होणार नाहीत. महिलांविषयी जनजाती समाजाने व एकुणच देशाने कधीच तडजोड केली नाही. विविध जनजातींच्या सर्वागीण प्रगतीसाठी आयोग काम करत असल्याचेही नंदकुमार साय यांनी सांगितले.
भारतीय नौसेना आयुध सेवेचे अधिकारी लक्ष्मणराजसिंह मरकाम यांनी सांगितले, पाचवी अनुसूची ही संविधानाचा हिस्सा आहे. राज्यात 47 प्रकारच्या जनजाती आहेत. 11 टक्के जनजाती एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. वनांमध्ये वास्तव्य करणा:या जनजातींची संख्या अधीक आहे. धरणांच्या क्षेत्रातील 60 टक्के जमीनींवर जनजाती समाज वास्तव्यास होता. त्यातून तो विस्थापीत झाला. परिणामी देशाच्या विकासात या समाजाचे मोठे स्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चैत्राम पवार यांनी सांगितले, समाजाच्या सर्वागिन विकासासाठी काय करता येईल याचा विचार वनवासी कल्याण आश्रमातर्फे केला जातो. धुळे जिल्ह्यात दहा गावांना सामुदायीक वनाधिकार मिळाले असून 14 गावांचे प्रस्ताव पाठविले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही प्रय} सुरू आहेत. जंगल, जल, जमीन, जन, गोधन हे आपल्या विकासाला आवश्यक असून ते आपल्याजवळ उपलब्ध आहे. सामुदायीक वनाधिकाराचा हक्क मिळण्यासाठी ग्राम संघटीत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिषदेत चार सत्रात विविध उपक्रम घेण्यात आले. सूत्रसंचलन अशोक पाडवी यांनी केले. प्रास्ताविक डॉ.विशाल वळवी यांनी केले. आभार विरेंद्र वळवी यांनी मानले.