सोयाबीनच्या स्वउत्पादित बियाण्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:36 AM2021-01-16T04:36:09+5:302021-01-16T04:36:09+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी ...
नंदुरबार : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१मध्ये सोयाबीनच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वउत्पादित बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनातून होणारे सोयाबीन बियाणे दोन वर्षांपर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी ते पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. शास्त्रीयदृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके योजनेंतर्गत शेतकरी समूहांकडून आलेल्या उत्पन्नातून बियाण्याची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाण्याची निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून, त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्यांची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्याला पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी पुढील हंगामात करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.