बिबटय़ाच्या भीतीमुळे शेतीकामांना ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:58 AM2019-08-26T11:58:05+5:302019-08-26T11:58:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ाच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक दहशतीने भयभीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ाच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक दहशतीने भयभीत झाले आहेत. शेतक:यांना शेतामधील पिकांची आंतरमशागत निंदणी, कोळपणीसाठी शेतमजूर बिबटय़ाच्या भीतीमुळे काम करण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. वनविभागाने तातडीने बिबटय़ांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ांचा मोठय़ा प्रमाणावर संचार असल्यामुळे दोन महिलांना आपले प्राण गमवावे लागले तर तीन जणांना गंभीर जखमी केले आहे. बिबटय़ांनी परिसरातील अनेक शेळ्या फस्त केल्या असून त्याचा थांगपत्ताच नाही. त्यासाठी पानसेमल व खेतिया परिसरात ठिकठिकाणी पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे. या सततच्या घटनांमुळे जनतेत वनविभागबद्दल तीव्र नाराजी असून वनविभागाच्या कार्यालयावर जुनापानी, ता.पानसेमल व परिसरातील नागरिकांनी दोन दिवसापूर्वी घेराव घालून संताप व्यक्त केला होता. यावेळी आदिवासी युवा एकता परिषद पानसेमल व विविध संघटना, पानसेमल ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप शितोळे, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने वनविभाग व अनुविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे वनविभागावर तीव्र संताप व्यक्त केला.
पानसेमल व खेतिया परिसरात बिबटय़ांच्या मोठय़ा प्रमाणावर संचारमुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक भयभीत असल्यामुळे वनविभाग व शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात यासाठी अनुविभागीय अधिकारी सुमेरसिंह मुजालदा यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे पानसेमल मंडळ अध्यक्ष व्ही.पी. सिंह सोळंकी, माजी आमदार दिवानसिंह पटेल, लोकेश शुक्ला, देवराज पाटील, भाजपा युवा मोर्चा बडवानी जिल्हाध्यक्ष राम सोनाने, भाजपा खेतिया मंडळ अध्यक्ष हेमराज पाटील, श्याम बर्डे व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.