नंदुरबारातील किमान तापमानात झपाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:23 PM2019-02-12T21:23:19+5:302019-02-12T21:23:25+5:30
नंदुरबार : १६ रोजी थंडीचा प्रभाव पुन्हा वाढणार
नंदुरबार : हवेचा दाब कमी झाल्याने नंदुरबारात किमान व कमाल तापमानात वेगाने वाढ झाली़ यामुळे दुपारी नागरिकांना अक्षरश: उकाडा सहन करावा लागला़
नंदुरबारात मंगळवारी १५.६ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली़ १० अंशावर स्थिर असलेले किमान तापमान मंगळवारी अचानक वाढले़ त्यामुळे सकाळी काहीशी थंडी तर दुपारी मात्र उकाडा निर्माण झाला होता़ गेल्या आठवड्यापासून वातावरणात कमालीचे बदल होताना दिसून येत आहेत़ कधी थंडी तर कधी उकाडा जाणवत आहे़ याबाबत हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांना विचारले असता हवेचा दाब जसा वाढेल तसा थंडीचा प्रभाव जाणवेल व दाब कमी झाल्यास साहजिकच काही प्रमाणात उकाडा जाणवेल असे सांगण्यात आले़
दरम्यान, १६ व १७ फेब्रुवारी दरम्यान, उत्तर व मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पुन्हा येण्याची शक्यता पुणे येथील वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे़ शनिवारी नंदुरबारात तब्बल ६.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले होते़ त्यानंतर मंगळवारी त्यात वेगाने वाढ होऊन किमान तापमान १५ अंशापर्यंत गेल्याने संमिश्र वातावरणाचा अनुभव नागरिकांना घेता येत आहे़
दरम्यान, वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने साथीचे आजार बळावले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच ग्रामीण व खाजगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी होताना दिसून येत आहे़ साधारणत: महिनाभर थंडीत असा चढ-उतार होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे़