आवगे-जुनवणे शिवारात बिबट्याच्या संचाराने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:47 PM2019-02-12T18:47:46+5:302019-02-12T18:47:55+5:30
शहादा : तालुक्यातील आवगे जुनवणे शिवारात दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली़ घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भिती पसरली ...
शहादा : तालुक्यातील आवगे जुनवणे शिवारात दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली़ घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भिती पसरली असून शेतशिवारात काहींना बिबट्या दिसून आल्याची माहिती आहे़
आवगे-जुनवणे गावालगत रविवारी संभू देविदास पाटील यांच्या शेतात शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला होता़ ही माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिला होती़ याचदरम्यान जुनवणे गावातील रोहिदास धुडकू चित्ते यांच्या मालकीची शेळी बिबट्याने हल्ला करुन ठार केली़ शेळीला ओढून शेतात नेऊन बिबट्याने फस्त केल्याचे शेतातील अवशेषांवरुन दिसून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे़ वनविभागाने येथे पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांची असून पोलीस पाटील हिरालाल पाटील यांनी वनविभाग व पोलीस ठाण्यात माहिती दिली होती़ शहादा तालुक्यात सध्या बिबट्यांचा संचार वाढल्याने शेतकरी आणि मजूर यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ रात्रीअपरात्री शेतशिवारात जाताना गटा-गटाने जावे लागत आहे़
तालुक्यातील इस्लामपूर शिवार आणि मध्यप्रदेश हद्दीत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत़ यामुळे तेथील बिबट्या या भागात आला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ परंतू आवगे परिसरात दिसून येणारा बिबट्या वेगळा असल्याचे वनविभागाने म्हटले आहे़ यामुळे शहादा तालुक्याच्या शेतशिवारात फिरणारे बिबट किती याबाबत शेतकºयांकडून विचारणा होत आहे़ वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्यास हुसकावून लावावे किंवा पिंजरे लावून बंदिस्त करावे अशी मागणी आवगे-जुनवणे ग्रामस्थांनी केली आहे़