बिबटय़ाच्या वास्तव्याने भीती
By admin | Published: January 8, 2017 11:59 PM2017-01-08T23:59:54+5:302017-01-08T23:59:54+5:30
प्रकाशा गावाजवळील घटना : दोन दिवसांपासून रात्रभर जागरण
प्रकाशा : गावाजवळील तळोदा रस्त्याला लागून भिक्षुकी करणा:यांची तात्पुरती वस्ती आहे. या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून या वस्तीतील नागरिक रात्र जागून काढत आहेत.
6 जानेवारी रोजी या वस्तीत बिबटय़ा अचानक घुसल्याने एकच धावपळ उडाली होती. तेथील सर्वानी एकत्र येऊन प्रतिकार केल्याने हा बिबटय़ा जवळील उसाच्या शेतात घुसला. त्यानंतर पूर्ण रात्री या नागरिकांनी जागून काढली. दुस:या दिवशी 7 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता दादा भगवान चव्हाण हे सकाळी सहा वाजता लघुशंकेसाठी झोपडीपासून काही अंतरावर गेले. पुढे गेल्यावर त्यांना पुन्हा बिबटय़ा तेथे दिसला. त्यांनी पळत माघारी येऊन आरडाओरड करीत सर्वाना सावध केले. त्यावेळीही सर्व जण लाठय़ाकाठय़ा घेऊन या बिबटय़ामागे धावले. तेव्हाही पुन्हा तो उसाच्या शेतात घुसला. ही घटना शहादा येथील वनविभागाकडे कळविल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 7 जानेवारी रोजी वनविभागाचे कर्मचारी सायंकाळपासून रात्रभर थांबल्यानंतर सकाळी निघून गेले. मात्र या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मात्र कायम आहे.
(वार्ताहर)