निर्भया घटना : एन्काऊंटरचे तरुणाईत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:30 PM2019-12-07T12:30:59+5:302019-12-07T12:31:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हैदराबाद येथील निर्भया प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर केल्यामुळे निर्भयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याचा प्रतिक्रिया जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हैदराबाद येथील निर्भया प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर केल्यामुळे निर्भयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याचा प्रतिक्रिया जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या. परंतु पीडित मुलीला जेवढ्या यातना अन् वेदना झाल्या तेवढा त्रास या आरोपींना झाला नसल्याची खंतही बोलून दाखविण्यात आली.
हैदराबाद येथील व्हेटनरी डॉक्टर मुलीवर सामुहिक अत्याचार करीत तिला पेट्रोल टाकून जाळण्यातही आले. ही घटनेचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत होती. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एन्काऊंटर करीत आरोपींचा खात्मा केला. या प्रकाराचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. महाविद्यालय परिसरात गटागटाने युवती, युवक याच विषयांवर चर्चा करीत होते. त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनी या घटनेचे स्वागत केले. व आरोपींना योग्य शिक्षा झाल्याचे म्हटले.
मुलींना काही अधिकार द्यावे
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हैदराबादच्या पोलीसांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु सुरक्षेसाठी महिला व मुलींना कायद्याने तेवढ्यापुरते काही हक्क व अधिकार दिले पाहिजे.
- स्रेहा बेडसे,
जीटीपी महाविद्यालय, नंदुरबार
आरोपींनाही वेदना व्हावी
एन्कॉऊंटरचा निर्णय पोलीसांनी ऐनवेळेस घेतला असला तरी ही बाब योग्यच आहे. अत्याचाराला आठ दिवस झाले. या आठ दिवसात पीडितेला झालेल्या वेदना या आरोपींनाही होणे अपेक्षित होते.
- अनिता पाडवी,
बी.एड.महाविद्यालय, नवापूर
प्रवृत्तीत बदलासाठी योग्यच
हैदराबाद पोलीसांसारखी भूमिका प्रत्येक अत्याचारदरम्यान घेतली असती तर कदाचित या घटना टळल्या असत्या. आज कुणावर विश्वास नसल्याने अशा प्रवृत्तीत भय निर्मितीसाठी व सुरक्षेसाठी एन्कॉऊंटर योग्यच आहे.
- प्रिया बागल,
जीटीपी महाविद्यालय, नंदुरबार
पोलिसांकडून सुरक्षेची अपेक्षा
एन्कॉऊंटर आधीच होणे अपेक्षित होते. पुढील घटना टाळण्यासाठी रात्री ९ वाजेनंतर बाहेर पडणाºया प्रत्येक महिला-मुलीस पोलीसांनी त्यांच्या वाहनाने त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचवावे.
-वृषाली पाटील, नंदुरबार
निर्भयाला न्याय मिळाला
न्यायव्यवस्था व पोलीस यंत्रणेचे अधिकाराचा मुद्दा उपस्थित होत असला तरी माता-भगिनींच्या निर्भय वातावरणासाठी ही कारवाई योग्यच आहे. मागील घटनांनुसार उशिर झाल्यास प्रकरणाला वेगळे वळण लागते. हैदराबादच्या घटनेला वळण लागण्यापूर्वी नागरिकांना अपेक्षित असलेली कारवाई हैदराबादच्या पोलीसांमार्फत करण्यात आली.
-बिरनसिंग कोकणी,
जिजामाता महाविद्यालय.
वृत्तीत बदल व्हावा...
मागील अशा घटनेतील आरोपींना शिक्षा झालीस, परंतु अशा प्रवृत्तीत पाहिजे तेवढे भय निर्माण झाले नाही. यंदाची कारवाईमुळे निश्चितच वासनांध प्रवृत्तीत बदल होईल.
-योगेश वसईकर, नंदुरबार
वेदना देवून मारावे...
जोपर्यंत आरोपीला वेदनेचे चटके देत नाही, तोपर्यंत पीडितांच्या वेदना त्यांना कळणार नाही. म्हणून आरोपींचे हाल केलेच पाहिजे.
-पवन कुंभार, नंदुरबार
भर चौकात शिक्षा मिळावी
हैदराबाद पोलीसांचे एन्काऊंटर योग्यच आहे. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षा देण्याची जबाबदारी समाजाकडे सोपवत भरचौकात शिक्षा द्यावी.
-भारत वाघ, नंदुरबार
वकिलांनी केस लढवू नये
अत्याचार ही सामाजिक समस्या असल्याने त्याला व्यावसायिक वळण देऊ नये. अशा प्रकरणात कुठल्याही वकिलांनी केस लढवू नये. यामुळे समाजात चांगला संदेश जाण्यास मदत होईल.
-चंद्रशेखर माळी, नंदुरबार