स्थलांतर रोखण्यासाठी फेलोज काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:51 PM2020-10-08T12:51:56+5:302020-10-08T12:52:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवून डीएम अर्थात ...

Fellows will work to prevent migration | स्थलांतर रोखण्यासाठी फेलोज काम करणार

स्थलांतर रोखण्यासाठी फेलोज काम करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवून डीएम अर्थात जिल्हाधिकारी फेलोजनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
निती आयोग आणि पिरामल फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘डीएम फेलोशिप’ उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचे कार्यक्रम संचालक सौमित्र मंडल, निती आयोगाच्या डीएम फेलोशिप कोअर ग्रुपचे सदस्य मनमोहन सिंग, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी बबन काकडे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, ग्रामीण भागात कृषीवनीकरणाच्या संकल्पनेवर भर द्यावा. प्रत्येक गावात शेततळे आणि रोपवाटीका उभारण्यासाठी प्रयत्न करावे. सांडपाणी व्यवस्थापन आणि शौचालयाच्या उपयोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनतेच्या बँक विषयक समस्या दूर करणे, प्रौढ शिक्षण, पोषण विषयक मार्गदर्शन अशा विविध क्षेत्राशी संबंधित कामाला प्राधान्य द्यावे.
पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दुर्गम भागात शासनाच्या योजना प्रभाविपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने युवकांनी नव्या कल्पना सुचवाव्यात. जनतेशी संवाद साधून तेथील परिस्थितीचे आकलन करून घ्यावे आणि नागरिकांच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. परिवर्तनाची महत्वाकांक्षा मनात बाळगून कार्य केल्यास या प्रायोगिक उकप्रमाद्वारे देशात चांगला संदेश जाईल. देशाचे आकलन करण्याची आणि पुढील जीवनासाठी अनुभवाची शिदोरी प्राप्त करण्यासाठी ही चांगली संधी आहे.
मंडल म्हणले, अकरा महिन्याच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांपासून शिकण्याची युवकांना संधी आहे. सिंग म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पोषण आदी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे उद्दीष्ट समोर ठेवावे. सोबत ही स्वत:चा विकास साधण्याची संधी आहे. जनसेवेची प्रेरणा हा या कार्यक्रमाचा गाभा आहे हे लक्षात घेऊन युवकांनी अधिकाधिक आपल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करावा. पुढील पिढीचे जीवन बदलण्याचे कार्य म्हणून ११ महिन्याच्या कालावधीतील कार्यक्रमाकडे पहावे आणि प्रशासन व जनतेच्या सहकायार्ने ग्रामीण भागात बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा वसुमना पंत यांनी व्यक्त केली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक किशोर घरत यांनी केले. श्रद्धा भोईटे, रा.पनवेल हीने सांगितले, ही जीवनातील एक चांगली संधी आहे. मला यामुळे ग्रामीण भागातील तळागाळाच्या लोकांचे काम, अडचणी सोडविण्यात आपला सहभाग देता येईल. फेलोशिपचा मला भविष्यात खुप अनुभव होईल. माझी निवड झाल्यामुळे मी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करते.

  • कार्यक्रमाचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिपसाठी ४,२३० उमेदवारांपैकी ५० युवकांची निवड करण्यात आली आहे. त्यातील दह नंदुरबार जिल्ह्यातील असून इतर २० राज्यातील व २० परराज्यातील आहेत. या कार्यक्रमासाठी निती आयोगाने एक कोटी २७ लाख मंजूर केले आहेत.
  • निवड झालेल्या युवकांना पुढील ११ महिन्यात जीवनातील वेगळा अनुभव प्राप्त होईल. त्यासाठी चांगली मानसिक तयारी आवश्यक आहे. आतापर्यंत प्राप्त केलेल्या ज्ञानाला परिसर अभ्यासाची जोड देत नव्या कल्पनांचे सृजन करता येईल. त्यातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे आणि हीच युवकांच्या कामाची प्रेरणा असावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकार यांनी व्यक्त केली.

Web Title: Fellows will work to prevent migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.