महिलेच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : लोकसंघर्ष मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:31 AM2021-09-11T04:31:06+5:302021-09-11T04:31:06+5:30
लोकसंघर्ष मोर्चाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदसैली येथील सिदलीबाई पाडवी या आजारी असल्याने त्यांचे पती आदल्या पाडवी ...
लोकसंघर्ष मोर्चाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदसैली येथील सिदलीबाई पाडवी या आजारी असल्याने त्यांचे पती आदल्या पाडवी हे त्यांना तळोद्याकडे घेऊन जात होते. दुर्दैवाने चांदसैली घाटात दरड कोसळल्याने आदल्या पाडवी हे त्यांना चालवत तळोद्याकडे आणत होते. परंतु रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी दिवशी केलीपानी (ता. तळोदा) या गावातून एका गर्भवती मातेला झोळी करून आणावे लागले होते. चांदसैली येथील उपकेंद्र येथे डॉक्टर हजर राहत नाहीत व उपकेंद्र बंद असते. याठिकाणी कोणत्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नसल्याने रेंज नाही. आरोग्य विभागाची १०८ ही गाडी मागवता येत नाही. तसेच मागील तीन वर्षांपासून चांदसैली घाटाच्या कठड्यांची व दरड कोसळेल याबाबतची लेखी तक्रार लोकसंघर्ष मोर्चामार्फत शासनाला करूनही कार्यवाही झालेली नाही. नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असून यासाठी विशेष निधी येतो. पंतप्रधान सडक योजनेची अनेक कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबत नवसंजीवनीच्या बैठकीत तक्रार मांडूनही काहीही फरक पडत नाही. आदिवासी विकासासाठी स्वतंत्र निधी असूनही दैना संपत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकसंघर्ष मोर्चा या सर्व प्रकाराची निंदा करत आहे. या घटनेला जबाबदार आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून आदल्या पाडवी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, कथा वसावे, रमेश नाईक, दिलवर पाडवी, जिलाबाई वसावे यांनी हे निवेदन दिले आहे.