लॉकडाऊनमध्ये अडकलीय मेडिकल कॉलेजची अंतिम मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:28 AM2020-05-11T11:28:54+5:302020-05-11T11:29:01+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मेडिकल कॉलेज संदर्भात केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुुटींची पुर्तता करण्यात आली आहे. ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मेडिकल कॉलेज संदर्भात केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुुटींची पुर्तता करण्यात आली आहे. अहवाल केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊनमुळे समितीचा दौरा होऊ शकला नसल्याने कॉलेजची परवाणगी पुन्हा अधांतरी लटकली आहे. पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठीचे आवश्यक ते सर्व विभाग सज्ज आहेत, प्राध्यापक व डॉक्टरांची नियुक्ती झाली असून परवाणगी मिळताच पहिल्या वर्षाला प्रवेश दिले जाणार आहेत.
नंदुरबार मेडिकल कॉलेज मंजुरीची घोषणा गेल्या सहा वर्षांपासून करण्यात आली आहे. आघाडी सरकारच्या काळात मंजूर होऊन ते रद्दही करण्यात आले होते. नंतर भाजप सरकारच्या काळात पुन्हा मंजुरी देण्यात आली. जळगाव व नंदुरबारच्या कॉलेजला मंजुरी मिळाली. परंतु जळगाव पुढे निघून गेले, नंदुरबार होते तेथेच राहिले. परंतु गेल्या वर्षभरात आवश्यक त्या प्रक्रिया पुर्ण होऊन आता कॉलेज सुरू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु कॉलेजला मान्यता देणाऱ्या समितीचा दौरा लॉकडाऊनमुळे अडकल्याने निर्णय अधांतरील लटकला आहे.
सिव्हील हस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण
जिल्हा रुग्णालय ९० टक्के कर्मचाऱ्यांसह मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्याची प्रक्रिया यापूर्वीच पुर्ण झाली आहे. कॉलेजसाठी प्रभारी डिन यांची नियुक्ती देखील झाली आहे. त्यांचे व त्यांच्या अधिनस्त कार्यालये देखील सुरू झाले आहेत. महाविद्यालयासाठी लागणाºया आवश्यक त्या बाबींकरीता सिव्हीलच्या रचनेमध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फलक देखील लावले गेले आहेत.
समितीने काढल्या त्रुटी
मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यासाठी डिसेंबर महिन्यात केंद्रीय समिती दाखल झाली होती. समितीने मंजुरीसंदर्भात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटींची पुर्तता १०० दिवसात करण्याचे देखील समितीने आपल्या अहवालात नमुद केले होते. त्यानंतर समिती पुन्हा एकदा पहाणी करून अंतिम मंजुरी देणार होती. १०० दिवसांच्या आत त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाची एकच धावपळ झाली. त्याच दरम्यान डीपीडीसीची बैठक होऊन खासदार डॉ.हिना गावीत व पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी बैठकीत विषय चर्चेला घेतला.
निधीसाठी डिपीडीसी धावून आली
मेडिकल कॉलेजच्या काही विभागांची स्थापना, आवश्यक यंत्र सामुग्री खरेदी यांच्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्याकरीता शासनाकडून निधी मिळणे दुरापस्त होते. त्यामुळे डीपीडीसीच्या माध्यमातून पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी ३ कोटी रुपयांचा निधी मंजुर करून घेतला. त्या निधीतून कामे पुर्ण करण्यात आली आहेत.
मार्चमध्ये होता दौरा
मंजुरी देणाºया समितीने काढलेल्या त्रुटींची पुर्तता करून मेडिकल कॉलेजच्या डिन यांनी परिपुर्ण अहवाल पाठविला होता. त्या अहवालाच्या आधारे समितीचा दौरा मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात अपेक्षीत होता. त्यादृृष्टीने तयारीही करण्यात आली होती. परंतु त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात लॉकडाऊन झाले. परिणामी समितीचा दौरा आता अनिश्चित झाला आहे.
जिल्हावासीयांच्या दृष्टीने मेडिकल कॉलेज येत्या वर्षात सुरू होण्यासंदर्भातील हातातोंडाशी आलेला घास आता हिरावला जातो की काय अशी शंका येवू लागली आहे. असे असले तरी अहवालाच्या आधारे समिती कॉलेजला मंजुरी देवून पहिल्या वर्षाच्या प्रवेशाला अनुमती देवू शकते असा विश्वास कॉलेजचे डिन डॉ.शिवाजी सुकरे यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्याबाबतचा निर्णय अपेक्षीत आहे.
मेडिकल कॉलेजला पहिल्या वर्षाच्या प्रवेशाला जे विभाग, साहित्य, यंत्रसामुग्री आवश्यक असते ते सर्व उपलब्ध आहे. समितीने काढलेल्या त्रुटींची पुर्तता करण्यात आली आहे. मंजुरी मिळताच कॉलेज सुरू होणार आहे. यंदा पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी सज्जता आहे. याकरीता खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून दिली जात आहे.
-डॉ.शिवाजी सुकरे, डीन,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार.
पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी आवश्यक बाबींची पुर्तता...
शरिर रचना शास्त्र विभाग.
शरिर प्रक्रिया शास्त्र विभाग.
जीव रसायन शास्त्र विभाग.
आवश्यक असलेले ३०० बेडपैकी ३१४ बेडचे रुग्णालय उपलब्ध.
पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी १०५ डॉक्टर व प्राध्यापकांची उपलब्धता.
लायब्ररीसाठी अभ्यासक्रमाची व संदर्भ ग्रंथांच्या १५०० पुस्तकांची आॅर्डर.
४आवश्यक उपकरण, यंत्रसामुग्रीसाठी हाफकिन इन्स्टीट्यूटला दिली आॅर्डर.
व्याख्यानकक्ष, प्रयोगशाळा यांची उपलब्धता पुर्ण.
कोवीड तपासणीची सोय झाली असती
लॉकडाऊनच्या आधीच समिती येवून पहाणी करून गेली असती आणि कॉलेजला मंजुरी मिळाली असती तर नंदुरबारातही कोवीड-१९ ची तपासणी प्रयोगशाळेला मान्यता मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे धुळे येथील तपासणी प्रयोगशाळेवरील ताण कमी होऊ शकला असता.