गट,गण रचनेचा आराखडा अंतिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:46 AM2018-08-13T11:46:49+5:302018-08-13T11:46:57+5:30
20 ऑगस्टला जाहीर होणार : 27 ऑगस्टला आरक्षण सोडत, वाढीव गटाकडे लक्ष
नंदुरबार : जिल्हा परिषदेचा नवापूर तालुक्यात वाढलेला गट कोणता राहतो याकडे लक्ष लागून आहे. प्रारूप गट, गण रणचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. त्यावर 20 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त शिक्कामोर्तब करणार आहेत. प्रारूप आराखडा व गट, गणांचे आरक्षण याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राजकीय पक्षांमध्ये सामसूम असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रशासकीय स्तरावर सुरूवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारूप गट, गण रचनेचा आराखडा प्राथमिक स्तरावर पुर्ण केला आहे. त्याचा अहवाल सोमवारी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा एक गट वाढणार असल्यामुळे हा गट कुठल्या तालुक्यात राहील याकडे आता लक्ष लागून आहे.
56 गट व 112 गणांची रचना
प्रशासनाने प्राथमिक स्वरूपात 56 गट व 112 गणांची प्रारूप रचना तयार केली आहे. गेल्या पंचवार्षीकला 55 गट व 110 गण होते. यंदा गेल्या पंचवार्षीकच्या तुलनेत गणांची संख्या अक्कलकुवा व नंदुरबार वगळता सर्वच तालुक्यात कमी, जास्त झाली आहे.
अक्कलकुवा तालुक्यात गेल्या पंचवार्षीकला 10 गट व 20 गण होते. यंदा गणांची व गटाचीही संख्या तेवढीच राहणार आहे. धडगाव तालुक्यात गेल्या पंचवार्षीकला आठ गट व 16 गण होते. यंदा सात गट व 14 गण राहणार आहेत. तळोदा तालुक्यात गेल्यावर्षी पाच गट व 10 गण होते यंदा गट व गणांची संख्या तेवढीच राहणार आहे.
शहादा तालुक्यात गेल्यावर्षी 13 गट व 26 गण होते यंदा 14 गट व 28 गण राहणार आहेत. नंदुरबार तालुक्यात गेल्यावर्षी दहा गट व 20 गण होते यंदा तेवढेच राहणार आहे तर नवापूर तालुक्यात गेल्यावर्षी नऊ गट व 18 गण होते यंदा 10 गट व 20 गण राहणार आहेत.
प्रारूप अहवाल तयार
जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 10 ऑगस्टर्पयत विभागीय आयुक्तांकडे प्रारूप गट-गण रचनेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार होता. परंतु कर्मचा:यांचा संप, मराठा आंदोलन आणि इतर कारणांमुळे प्रस्ताव 10 ऐवजी आता सोमवार, 13 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.
या प्रस्तावाला विभागीय आयुक्त 20 ऑगस्ट रोजी मान्यता देणार आहेत. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गट, गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. 30 रोजी प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
गट, गण रचनेसाठी गेल्या 15 दिवसांपासून संबधित कर्मचारी कामाला लागले होते. आता त्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे. कुठला गट किंवा गण कसा राहील याकडे इच्छूक आणि राजकारणी मंडळींच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, गट-गण रचनेचा मसुदा गोपनीय राहणार असून विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतरच तो जाहीर केला जाणार आहे.