अखेर आंबेबारा धरण ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:32 PM2019-08-04T13:32:38+5:302019-08-04T13:32:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. याशिवाय 70 टक्के पाणीपुरवठाची मदार असणा:या विरचक प्रकल्पात ज्या डॅमच्या सांडव्यामधून पाणी येते ते खोलघर धरण देखील ओसंडून वाहू लागले आहे. परिणामी विरचकमधील पाणीसाठा 14 टक्केपेक्षा अधीक झाला आहे.
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण गेल्यावर्षी 80 टक्के तर विरचक प्रकल्प केवळ 29 टक्के भरला होता. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळा लांबल्याने जून महिन्यात शहरवासीयांना काही प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदाच्या दुष्काळात राज्यात सर्वत्र टंचाई असतांना अनेक ठिकाणी दोन ते आठ दिवसात पाणी पुरवठा होत असतांना नंदुरबार पालिकेने नियोजन करून नियमित एक दिवसाआड एकवेळ पाणी पुरवठा सुरू ठेवला होता.
यंदा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत पुरेसा पाऊस नव्हता. आंबेबारा धरण तर एप्रिल महिन्यातच कोरडे झाले होते. विरचकमध्येही केवळ डेड स्टॉक शिल्लक होता. परिणामी 1 ऑगस्टपासून नंदुरबारात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. सुदैवाने जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. विरचक आणि आंबेबारामध्ये पाणी येऊ लागल्याने हा निर्णय लागलीच रद्द करण्यात आला.
आंबेबारा भरले..
आंबेबारा धरण गेल्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. जवळपास 10 ते 12 वर्षानंतर अशी परिस्थिती होती. परिणामी हे धरण एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कोरडे झाले. येथून होणारा पाणी पुरवठा देखील तेंव्हापासून बंद झाला होता. त्यामुळे विरचक प्रकल्पावर संपुर्ण 100 टक्के पाणी पुरवठय़ाचा ताण पडत होता. यामुळे वारंवार पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत होत होते. आताच्या दमदार पावसामुळे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातील पाणी शिवण नदीद्वारे विरचक प्रकल्पात येत आहे. लवकरच आष्टे पंपींग स्टेशनवरूनही पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे.
खोलघर धरणही ओसंडले..
शिवण नदीचा जलप्रवाह ज्या धरणावर अवलंबून आहे ते नवापूर तालुक्यातील खोलघर धरण देखील भरून वाहू लागले आहे. यामुळे आंबेबारा आणि खोलघर धरणातील ओसंडणा:या पाण्याचा प्रवाह शिवण नदीत येत असल्यामुळे विरचक प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सद्य स्थितीत विरचक प्रकल्पात 14 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे. आणखी 10 टक्के पाणीसाठा झाला तर संपुर्ण वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे.