नंदुरबार जिल्ह्यातील पालिकांना वित्त आयोगाचा 11 कोटींचा निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:03 PM2018-04-01T13:03:01+5:302018-04-01T13:03:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार नगरपालिका व एक नगरपंचायतीला अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. एकुण जवळपास 11 कोटींची रक्कम या पालिकांना मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना संपणा:या आर्थिक वर्षातील मुलभूत अनुदानाचा दुसरा हप्ता नगर विकास विभागाने वितरीत केला आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ही रक्कम दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील नंदुरबार ही अ वर्ग नगरपालिका याशिवाय शहादा व नवापूर ही ब तर तळोदा क वर्ग नगरपालिका आणि धडगाव नगरपंचायतींचा त्यात समावेश आहे.
पालिकांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या यानुसार या निधीचे वितरण केले जात असते. त्यानुसार नंदुरबार पालिकेला सर्वाधिक चार कोटी 99 लाख 33 हजार 956 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या खालोखाल शहादा पालिकेला दोन कोटी 55 लाख 73 हजार 111 रुपयांचा निधी, तळोदा पालिकेला एक कोटी 11 लाख 54 हजार 406 रुपयांचा, नवापूर पालिकेला एक कोटी 60 लाख 21 हजार 526 रुपयांचा तर धडगाव-वडफळ्या नगरपंचायतीला 67 लाख 41 हजार 101 रुपयांचा निधी मिळणार आहे.
या निधीतून संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामे करावी लागणार आहेत. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे.