मोबाइल दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:04 AM2017-07-29T01:04:10+5:302017-07-29T01:07:58+5:30

भरपावसातही आग आटोक्यात येईना : बंब आला पण निम्मा रिकामा

Fire in the mobile store | मोबाइल दुकानांना आग

मोबाइल दुकानांना आग

Next
ठळक मुद्देपाणी वाटपामुळे अग्निशमन बंब आले उशिरा मोबाइल विक्रीची दोन दुकाने खाक


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शॉर्ट सक्रिटमुळे लागलेल्या आगीत बसस्थानक परिसरातील मोबाइल विक्रीची दोन दुकाने खाक झाली, इतर दोन दुकानांचे किरकोळ नुकसान झाले. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. दरम्यान, पावसाच्या रिपरिपमध्येही ही आग लवकर आटोक्यात येऊ शकली नव्हती.
बसस्थानक परिसरात खासगी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्यात ओळीने चार ते पाच मोबाइल विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यापैकी परफेक्ट मोबाइल या दुकानाचे मालक रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले. रात्री सव्वाअकरा ते  साडेअकरा वाजेच्या सुमारास दुकानातून धूर येताना काहींना दिसला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. दुकान मालकाला सिंधी कॉलनीतून बोलविले असता, त्यांनी दुकानाचे शटर उघडले. त्यानंतर आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्या, त्यानंतर आग आणखी भडकली. शेजारच्या दुकानातदेखील आगीची आस लागल्यानंतर त्या दुकानाचेही नुकसान झाले. इतर दोन दुकानांनाही त्याची झळ पोहोचली. अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. पहिला बंब आला, परंतु त्यात अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे लागलीच तो रिता झाला. दुसरा बंब येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत मोबाइलची बॅटरी आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्यदेखील जळत असल्याने फटाके फुटण्यासारखे आवाज येत होते. त्यामुळे आगीची भयानकता आणखी जाणवत होती. पावसाच्या रिपरिपमध्येदेखील आग भडकत असल्याचे चित्रही या वेळी पहावयास मिळत होते.
नुकसानीचा आकडा मोबाइल  कंपनीचे कर्मचारी आल्यानंतर कळू शकणार आहे. याबाबत अग्निउपद्रवान्वये घटनेची नोंद करण्यात आली आहे. 


शहरात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे टँकर व अग्निशमन बंबाद्वारे अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यातच ही आगीची घटना घडल्याने बंब येण्यास उशीर झाला. एक बंब आला, परंतु त्यातही अर्ध्यापेक्षा कमी पाणी असल्यामुळे त्याचाही उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात रोषही व्यक्त करण्यात आला.

Web Title: Fire in the mobile store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.