प्रकाशात पाच एकरवरील हरभरा माथेफिरूने जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:29 AM2019-03-19T11:29:40+5:302019-03-19T11:29:59+5:30
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात पाच एकर क्षेत्रातील कापलेल्या हरभरा पिकाच्या ढीगाला माथेफिरुने रात्रीच्यावेळी आग लावून नुकसान केल्याची ...
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात पाच एकर क्षेत्रातील कापलेल्या हरभरा पिकाच्या ढीगाला माथेफिरुने रात्रीच्यावेळी आग लावून नुकसान केल्याची घटना घडली. त्यात शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील रहिवासी विजय मदन चौधरी यांचे धुरखेडा रस्त्यावर शेत आहे. त्यांनी पाच एकर क्षेत्रात हरभरा पिकाची पेरणी केली होती. हे पीक तयार झाल्यानंतर १४ मार्च रोजी कापून सुकविण्यासाठी शेतातच ढीग करून ठेवला होता. १८ मार्च रोजी ते या पिकाची काढणी करणार होते. तत्पूर्वीच १७ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात माथेफिरुने कापणी केलेल्या हरभरा पिकाच्या ढीगाला आग लावून नुकसान केले. त्यात विजय चौधरी यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही घटना सकाळी शेतकरी विजय चौधरी यांना कळताच शेतात धाव घेतली. जळालेला सर्व हरभरा बघून ढसाढसा रडायला लागले. हा प्रकार निंदनीय असून हरभरा पिकासाठी शेतकऱ्याने लावलेला खर्च व येणारे उत्पन्न पाहता सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वर्षभराची कमाई एका रात्रीतून खाक झाली तेव्हा या माथेफिरूचा शोध घेऊन कडक कारवाई करावी व शासनाने संबंधित शेतकºयाला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रकाशा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. रविवारी सकाळी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रातील गौतम बोराळे, तलाठी डी.एम. चौधरी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.