घरीच होणार पाच वेळची नमाज अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:35 PM2020-04-26T13:35:08+5:302020-04-26T13:35:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन व संचारबंदी असुनही मुस्लीम समाजात रमजानचा उत्साह कायम आहे. आजपासुन रमजानच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन व संचारबंदी असुनही मुस्लीम समाजात रमजानचा उत्साह कायम आहे. आजपासुन रमजानच्या पवित्र पर्वास प्रारंभ झाला. रमजान महिन्यास इस्लाम धर्मात अनन्य साधारण असे महत्व आहे. एक महिन्याचे उपवास करुन अल्लाहला राजी करण्याचा प्रयत्न या महिन्यात मुस्लिम समाजबांधव करीत असतात. बालकांपासुन वयोवृध्द अश्या सर्व वयोगटातील नागरिक रोजा करुन पाचही वेळची नमाज कसोशीने अदा करतात.
पवित्र रमजान महिन्यात रात्रीच्या वेळेस समाजबांधव एकत्रित येउन तरावीहची नमाज अदा करीत आले आहेत. कोरोनामुळे सामाजिक दुरी ठेवणे आवश्यक असल्याने यंदा मात्र दिवसातील पाचवेळची नमाज समाजबांधवांकडुन घरीच अदा केली जात आहे. तरावीहची नमाजमधे कुराणचे पठण करण्यात येते. प्रत्येकाला कुराण तोंडीपाठ नसल्याने तरावीहच्या घरी अदा होणार्या नमाजला बहुसंख्य जणांना मुकावे लागत आहे. मशिद बंद ठेवता येत नसल्याने प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत मशिदीत सामाजिक दुरी ठेउन पाचजण मिळुन नमाज अदा केली जात आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतांना रमजानच्या रोजाची सुरुवात झाली आहे. चौदा तास तीस मिनिटांचा पहिला रोजा असुन तिसाव्या रोजा पावेतो हा कालावधी पंधरा मिनिटांनी वाढणार आहे. उन्हाळा तिव्र असतांनाही रोजा करणार्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. लॉकडाउन व त्या अनुषंगाने बाजाराची वेळ पाहता रमजानच्या औचित्याने भरणार खमंग चवीच्या वस्तु व शितपेय तथा खाद्यपदार्थांची सजणारी दुकाने थाटली जात नसल्याने इफ्तारसाठी घरच्याघरी तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवरच रोजेदारांना समाधान मानावे लागत आहे.
जागतिक समस्या झालेल्या कोरोनाच्या प्रकोपामुळे खानकाही व्यवस्थाही यंदा संपुर्ण देशात प्रभावित झाली आहे. मोठे मद्रेश्यात ही परंपरा राबविण्यात येते. त्यात एक महिना घरापासुन लांब राहुन मशिदीत वास्तव्य करुन एक महिन्याचा ऐतेकाफ करुन अल्लाहची इबादत करुन त्यास राजी करण्याचा प्रयत्न होत असतो. सामाजिक दुरीमुळे यंदा एतेकाफ व खानकाही व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तरीही समाजबांधवांनी आपल्या घरातच राहुन रमजान मधील सर्व सोपस्कर पार पाडुन अल्लाहला राजी करण्याचा व कोरोनाच्या जिवघेण्या संकटापासुन जगाला मुक्त करण्यासाठी दुवा करण्याचे आवाहन समाजातील आगेवान धर्मगुरुंकडुन समाजबांधवांना करण्यात येत आहे. प्रत्येक नमाजनंतर व पहाटेच्या प्रहरी तहाज्जुदच्या नमाजमधुन दुवा करण्याचे या आवाहनातुन अधोरेखित करण्यात येत आहे.