नंदुरबारात आणखी पाच पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:06 PM2020-07-03T17:06:01+5:302020-07-03T17:06:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तब्बल पाच दिवसांच्या ब्रेकनंतर जिल्ह्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात चौघे हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तब्बल पाच दिवसांच्या ब्रेकनंतर जिल्ह्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात चौघे हे नंदुरबार शहर आणि तालुक्यातील असून नवापुर येथे आणखी एक रुग्ण आढळून आला आहे़
धुळे येथील लॅबमधील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता़ परिणामी लॅबमधील कामकाज बंद पडले होते़ यातून पाच दिवसांपासून जिल्ह्यातून पाठवण्यात येणारे स्वॅब तपासले गेले नव्हते़ गुरुवारी रात्रीपासून लॅबमध्ये कामांना पुन्हा सुरुवात झाल्याने नंदुरबार येथील २९ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली़ यात पाच जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत तर २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ पॉझिटिव्ह आलेल्यात नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीतील ३६ वर्षीय पुरुष, पंचायत समितीतील ३२ वर्षीय पुरुष, देसाईपुरा भागातील ५० वर्षीय महिला व तालुक्यातील खोंडामळी येथील ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे़ कोरोनामुक्त असलेल्या नवापुर शहरातही कोरोनाने खाते उघडले आहे़ मंगलदास पार्क येथील ६५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पॉझिटिव्ह आढळून आलेल्या पाच पैकी चार जण आधीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ पंचायत समितीचे अधिकारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कोरोना कक्षात रवाना झाले़
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही १६८ झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे़ दरम्यान पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असतानाच सिंधी कॉलनीतील तीन जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ त्यांना दुपारी डिस्चार्ज देण्यात आला़