नवापुरातील अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 06:10 PM2018-08-17T18:10:23+5:302018-08-17T18:10:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन जण तर घराची भिंत अंगावर पडून दोनजण अशा एकुण पाच जणांचा मृत्यू झाला. 27 पाळीव जनावरे देखील दगावली असून 100 पेक्षा अधीक घरांचे नुकसान झाले आहे. एक पूल आणि पाच रस्ते देखील वाहून गेले आहेत. धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, पंचनाम्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.
अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सईदा हसन काकर (57) रा.राजीवनगर, नवापूर, जमनाबाई लाशा गावीत (65) रा. बालाहाट, नवापूर, वंतुबाई दोंदल्या गावीत (55) रा.खोकसा, काशीराम बाबजी गावीत (50) रा. वाघळापाडा यांचा समावेश आहे. आणखी एकाचे नाव समजू शकले नाही. नवापूर तालुक्यात शुक्रवारी उत्तररात्री तीन तास मुसळधार पाऊस झाला. तीन तासात 140 मि.मी. पाऊस झाला. एकटय़ा विसरवाडी मंडळात 235 मि.मी.पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांना पूर येवून मोठय़ा प्रमाणावर जिवीत व वित्तहाणी झाली.
याशिवाय 17 म्हशी, पाच गायी, चार शेळ्या व एक घोडा असे एकुण 27 पाळीव प्राणी देखील दगावले आहेत. नवापूर शहरातील रंगावली नदी काठावरील 65 घरे भुईसपाट झाली आहेत तर इतर ठिकाणी 15 व विसरवाडी येथे 15 आणि चिंचपाडा येथे 10 घरांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे व पुरामुळे चार ठिकाणचे रस्ते तर एक पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दळणवळण यंत्रणा देखील ठप्प झाली आहे. धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक विसरवाडी ते दहिवेलदरम्यान ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक साक्री, पिंपळनेर, दहिवेल व विसरवाडी, खांडबारा, नंदुरबार, शेवाळीफाटा अशी वळविण्यात आली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसात नवापूर व धडगाव तालुक्याला झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दहा मंडळात 65 मि.मी.पेक्षा अधीक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस विसरवाडी महसूल मंडळात झाला आहे. या भागात ढगफुटीचा अनुभव नागरिकांना आला. तीन तासात तब्बल 235 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल चिंचपाडा मंडळात 192 मि.मी., नवापूर मंडळात 140 मि.मी., नवागाव मंडळात 90 तर खांडबारा मंडळात 64 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. उघडय़ावर आलेल्यांना तात्पुरती मदत देवून त्यांच्या निवा:याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांच्यासह महसूलच्या सर्व वरिष्ठ अधिका:यांनी घटनास्थळी भेटी देवून मदतकार्याला वेग दिला आहे.