तळोद्यातील विद्याथ्र्याची पाच हजार रोपांची रोपवाटीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:07 PM2018-05-18T13:07:22+5:302018-05-18T13:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : श्रमदान अन् स्वखर्चातून शहरातील महाविद्यालयीन तरुणानी रोप वाटीकेचे काम हाती घेतले असून, विविध प्रजातीचे साधारण पाच हजार रोपे तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे सर्व रोपे वेगवेगळ्या फल फळावळची असल्याने सातपुडय़ातील आदिवासींना रोजगार मिळणार आहे. कारण रोपे मुख्यता सातपुडय़ाच्या डोंगरावरच लावण्यात येणार आहे.
एकेकाली गर्द झाडी व हिरवाईने नटलेला सतपुडा गेल्या तीन, चार दशकापासून उध्वस्त होत आहे. अलीकडे बेसुमार वृक्षतोडीमुळे तर आता पूर्णता बोडका झाला आहे. साहजिकच त्याचे वैभवदेखील लयास पावले आहे. त्याचे गत वैभव प्राप्त होण्यासाठी शहरातील दिग्विजय प्रतिष्ठानचे वृक्ष मित्र दिग्विजय माळी, प्रा.डॉ.महेंद्र माळी, हितेश वाघ, अंकित सूर्यवंशी, अजय परदेशी, जयदीप सूर्यवंशी, निखिल सागर, शिवम सूर्यवंशी, जागृत तवाले, मनोज कुमावत, सौरभ सूर्यवंशी, गौरव माळी अशा 15 महाविद्यालयीन तरुणांनी तळोदा महाविद्यालचे भूगोल विभागाचे प्रमुख प्रा.राजू यशोद यांचा सहकार्याने महाविद्यालयाच्या जागेवर म्हणजे पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर श्रमदान व स्वखर्चाने रोपवाटीकेचे काम हाती घेतले आहे.
गेल्या महीना भरपासून हे युवक तीव्र उन्हाची तमा न बाळगता अतिशय मेहनत घेवून काम करीत आहेत. आता पावेतो त्यांनी यावर आठ ते दहा हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले. या रोपवाटीकेत मुख्यता महू, आंबा, सीताफल, जांभूळ, करवंद अशा प्रजातीची फळांची रोपे लावण्यात येत आहे. ही रोपे दोन वर्षे चांगली वाढल्या नंतर लागवडीस देण्यात येणार आहेत. इथेच सेंद्रीय खतदेखील तयार करुण रोजगार निर्मितिचे प्रशिक्षण युवकांना दिले जाणार आहे. एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवडीवर भर देत असल्याचे चित्र आहे. परंतु ते जगतीलच याची शास्वती नाही. तथापि हे तरुण शासनाकडून कुठलीच मदतीची अपेक्षा न करता स्वखर्चाने रोप वाटीका तयार करीत आहे. युवकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
सातपुडय़ातील तरुणा ना रोजगार मिळणार:या रोप वाटीकेच्या माध्यमातून हे युवक हरीत सतपुडा अभियान राबविणार आहेत. कारण डोंगरावरच वृक्षांची लागवड करणार आहेत. त्यातही महू, आंबा, सीताफल या वृक्षावर अधिक भर देणार असल्यामुळे तेथील आदिवासीना रोजगार प्राप्त होईल. असे असले तरी या तरुणांची वृक्ष लागवड चळवळीस इतर युवकांनी ही हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.