तीन गुन्ह्यातील पाच जण गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:25 PM2018-09-29T12:25:20+5:302018-09-29T12:25:42+5:30
लाखोंचा ऐवज जप्त : घरफोडी, पाकीटमार व मोबाईल चोरीतील संशयीत
नंदुरबार : शहरात घरफोडी, पाकीटमार करणा:या चोरटय़ांना शहर पोलिसांनी जेरबंद केले असून वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून एकुण दोन लाख 88 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या संशयीतांकडून आणखी काही इतर चोरीच्या घटनांची माहिती मिळणार असून त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात दुचाकी चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असून दुचाकी चोरटय़ांनाही जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी व पाकीटमारीसह मोबाईल चोरटय़ांचा सुळसुळाट झाला आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा असल्याची संधी साधून या चोरटय़ांनी उच्छाद मांडला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. गणेशोत्सव आणि मोहर्रम बंदोबस्ताचा ताण संपताच शहर पोलिसांनी चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार तीन गुन्ह्यातील पाच संशयीतांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख 87 हजार 900 रुपयांपेक्षा अधीकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरटे हे स्थानिकच असून त्यांना आणखी इतर कुठल्या ठिकाणच्या चोरटय़ांची मदत आहे किंवा कसे यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस निरिक्षक गिरीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील धुळे रोड परिसरातील एका दुकानातून चोरटय़ांनी एक लाख तीन हजार, 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले होते.
याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून संतोष उर्फ खंडय़ा सुरेश कदम, रा.संजयनगर व नारायण नंदू गवळी रा.गवळीवाडा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुकान फोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून ब्ल्यू डार्ट कुरीयरचे सामान, लॅपटॉप, प्रिंटर व मोटरसायकल असा एकुण एक लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुसरी घटना बसस्थानकात घडली होती. बसमध्ये चढत असतांना एका प्रवाशाचे पाकीट मारले गेले होते. त्यावेळी संशयीतरित्या फिरत असतांना तेथील डय़ुटीवरील कर्मचा:याने रवींद्र भिला साळवे, रा.उमर्दे खुर्द याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने प्रवाशाच्या खिशातून पाच हजार 400 रुपये रोख काढल्याचे सांगितले. त्याच्यासोबत उमेश मंगलसिंग पाटील, रा.स्वराज्य नगर, नंदुरबार हा देखील असल्याचे सांगितल्यावर त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून पाच हजार 400 रुपये जप्त करण्यात आले. त्याशिवाय अल्पवयीन गुन्हेगाराकडून चार हजार रुपये जप्त करण्यात आले. या संशयीतांनी एकुण 12 हजार 500 रुपयांची पाकिटमारी केली होती. पैकी नऊ हजार 400 रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.
बसस्थानकातच एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरीस गेला होता. याबाबत पोलिसांनी रवींद्र भिला साळवे यालाच ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली देत 14 हजार 208 रुपये किंमतीचा मोबाईल काढून दिला. त्याची अधीक चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणाहून एकुण आठ जणांचे एक लाख दोन हजार रुपयांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले. ते मोबाईल देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक गिरीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार रवींद्र कुवर, रामा वळवी, गणेश चव्हाण, विश्वास गावीत, राकेश मोरे, लक्ष्मीकांत निकुंभ, योगेश लोंढे, जितेंद्र पाडवी, विजय ढिवरे, भरत पावरा यांनी ही कामगिरी केली.