दुकानातील महिलेच्या गळ्यातून भरदिवस सोनपोत ओरबडून पलायन
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: July 12, 2023 18:48 IST2023-07-12T18:47:51+5:302023-07-12T18:48:17+5:30
या प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकानातील महिलेच्या गळ्यातून भरदिवस सोनपोत ओरबडून पलायन
नंदुरबार : दुकानातील महिलेच्या गळ्यातून एक लाख ३५ हजार रुपये किमतीची सोनपोत ओरबडून दोघांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी सायंकाळी नवापुरातील जनता पार्क भागात घडली. या प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नवापूर येथील जनता पार्क भागात साई-दौलत किराणा दुकान आहे. या दुकानात रजनी सुधीर पाटील (५६) या बसलेल्या होत्या. दुकानात अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील दोघे दुचाकीवरून आले. त्यातील एकाने दुकानात येऊन १० रुपयांची खारी मागितली. महिलेने दहा रुपयांची खारी येत नसल्याचे सांगितल्यावर २० रुपयांची खारी व २० रुपयांची कॅटबरी मागितली.
महिलेला बोलण्यात गुंतवून व आजूबाजूला कुणीही नसल्याची संधी साधून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबडून घेतली. यानंतर क्षणाचाही विलंब न करता बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून दोघेही पसार झाले. महिलेने आरडाओरडा केला, परंतु तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत रजनी सुधीर पाटील यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार अशोक मोकळ करत आहेत.