शहाद्यात वाघाची कातडी आणि नखे विक्रीसाठी आलेल्या तिघांना वनविभागाकडून अटक
By भूषण.विजय.रामराजे | Published: May 2, 2023 05:30 PM2023-05-02T17:30:40+5:302023-05-02T17:31:00+5:30
शहादा शहरात वाघाची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
नंदुरबार : शहादा शहरात वाघाची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वाघाची कातडी आणि नखे जप्त करण्यात आली. शहाद्यातील एका ग्राहकाला ही कातडी आणि नखे देण्यासाठी चाैघे आले होते. गुजरात राज्यातील चाैघांनी वाघाची कातडी आणि नखे आणल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहादा येथील चंदन चमनलाल डेटवाणी (२७) याला वाघाची कातडी आणि नखे विक्री करण्यासाठी नाशिक आणि धुळे येथून तिघेजण आल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. वन पथकाने तिघांचा माग काढून तात्काळ सापळा रचून कारवाई केली. तिघांकडून वाघाची कातडी आणि २० नखे जप्त करण्यात आली. सह नखे रामचंद्र गोविंदा जाधव (४०) रा. मोराणे, ता. सटाणा जि. नाशिक , रामा सायसिंग उमरे,(२५) रा. चिपी, ता. सटाणा जि. नाशिक, सुखीराम महारु भदाणे, (४५) रा. बंधारपाडा, ता. साक्री जि. धुळे अशी कातडी तस्करांची नावे आहेत. वनाधिकाऱ्यांनी तिघांसह ग्राहक असलेला चंदन डेटवाणी यालाही ताब्यात घेतले आहेत. चाैघांना शहादा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ५ दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई नंदुरबार उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक संजय साळुंके, वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे, वनपान एस. एन. पाटील, डी. बी.जमदाळे , वनरक्षक एस.जी मुकाडे, ए.एन तावडे, आर.जी. वसावे, एफ.एन. वसावे, बालाजी इंगळे, दीपक पाटील, वाहन चालक नइम मिर्जा, विक्रम पानपाटील यांनी केली.