वन विभागातर्फे १२ लाखाचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:55 AM2020-10-03T11:55:18+5:302020-10-03T11:55:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : २१ आॅगस्ट रोजीच्या दाखल वन गुन्ह्यातील फरार वाहन वन विभागाने नवापूर पोलिसांच्या मदतीने आज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : २१ आॅगस्ट रोजीच्या दाखल वन गुन्ह्यातील फरार वाहन वन विभागाने नवापूर पोलिसांच्या मदतीने आज मोठ्या बंदोबस्तात जामतलाव येथून ताब्यात घेतले. या कारवाईत मशिन व ताज्या तोडीचे साग चौपाट नग असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कारवाईवेळी जामतलाव गावाला छावणीचे स्वरूप आले होते.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वनरक्षक बोरझर यांचेकडील २१ आॅगस्ट रोजीच्या प्रथम रिपोर्ट क्रमांक १० मधील फरार वाहन, अवैध मुद्देमाल व रंधा मशिन जप्त करण्यासाठी वन विभागाचा फौज फाटा व पोलीस जामतलाव गावात दाखल झालेत.
गुन्ह्यातील संशयित इसमास अटक करणेसाठी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांचे समवेत नंदुरबार वनविभाग मधील वनक्षेत्र नवापूर, चिंचपाडा, खांडबारा, शहादा, नंदुरबार, काकडदा, फिरते पथक शहादा तसेच धुळे वनविभाग मधील वनक्षेत्र कोंडाईबारी व पिंपळनेर मधील सर्व वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांचा फौज फाटा मौजे जामतलाव गावात धडकला. संशयिताच्या घराची व परिसराची सर्च वारंटने झडती घेतली असता संशयित फरार झाल्याने घटनास्थळी दिसून आला नाही. घरात रंधा मशिन, डिझाईन मशिन, पाया उतार मशिन, डिझेल इंजिन व ताज्या तोडीचे साग चौपाट सहा नग मिळाले. घराचे दोन्ही बाजूस फरार असलेले लाल रंगाचे वाहन व पांढऱ्या रंगाचे अन्य वाहन अशी दोन वाहने आढळून आली.
वन विभागाने दोन्ही वाहन मुद्देमाल व यंत्र सामुग्री नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जप्त केले. जप्त वाहन व मुद्देमालाची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे. वन विभागाच्या विविध कार्यालयांच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नवापूर व वन कर्मचारी करित आहेत.
नवापूर तालुक्यात वेळोवेळी अवैध लाकूड तोड आणि लाकूड साठा प्रकरणी वन विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूडचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.