कोरोनाच्या कटू आठवणी विसरत पतंगोत्सवाची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:05 PM2021-01-15T13:05:39+5:302021-01-15T13:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिल की पतंग उडी, उडी जाय... अहिराणी, आदिवासी बोलीभाषेची डिजेवर वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांची धूम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिल की पतंग उडी, उडी जाय... अहिराणी, आदिवासी बोलीभाषेची डिजेवर वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांची धूम यंदाच्या पतंगोत्सवात दिसून आली. दिवसभर रंगबेरंगी पतंगांनी व्यापलेले नंदुरबारचे आकाश आणि डिजेच्या तालावर उंच आकाशात पतंग नेण्याची होणारी कसरत आज दिवसभर दिसून येत होती. कोरोनानंतरचा हा सर्वांत मोठा उत्सव नागरिकांनी साजरा केला. दरम्यान, पतंगाचा मांजा लागून अनेकजण किरकोळ जखमी झाले तर अनेक पक्षीदेखील सैरावैरा होत होते. पतंग विक्रीतून हजारो रुपयांची उलाढाल झाली.
नंदुरबारचा पतंगोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे. खास या उत्सवासाठी ठिकठिकाणाहून नातेवाईक, मित्रपरिवार येथे दाखल होत असतात. त्यामुळे या उत्सवाची क्रेझ काही औरच आहे. पतंग उडविण्यासाठी अपेक्षित हवेचा वेग सकाळी बऱ्यापैकी होता. त्यामुळे पहाटे पाच वाजेपासूनच हौसी मंडळींनी डिजेच्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजावर पतंग उडविण्यास सुरुवात केली.
सकाळी दिवस उजडेपर्यंत नंदुरबारसह परिसरातील आकाश रंगीबेरंगी पतंगांनी व्यापून गेले होते. रात्री उशिरापर्यंत हा उत्साह कायम होता. रात्रीही काही हौसी पतंगप्रेमींनी दिव्याचे मिनमिनते पतंग उडविण्याची हौैसही भागवून घेतलीच. बुधवारी रात्री तर पतंग विक्री करणाऱ्या व मांजा बनविणाऱ्यांकडे मोठी गर्दी झाली होती. मध्यरात्रीपर्यंत पतंगांचा बाजार भरला होता. मुख्य चौक व रस्त्यांवर पतंग विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती.
पतंगत्सोवाची रंगत भल्या पहाटेपासूनच सुरू झाली होती. डिजे, ढोल-ताशांचा निनादात पहाटेपासून पतंग उडविले जात होते. घरांच्या गच्चीवर लावण्यात आलेले डिजे व ढोल-ताशेमुळे कुणाकडे कोणते गाणे सुरू आहे तेच समजून येत नव्हते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा आज कहरच झाला होता. पतंगोत्सवात आकंठ बुडालेल्यांनी त्याकडे कानाडोळा केला. दुपारपर्यंत उत्साह होता.दुपारनंतर हवेचा मंदावलेला वेग मंदावला. यामुळे त्यात काहीशी शिथिलता आली. नंतर दुपारी ४ वाजेपासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक घराची गच्ची पतंग उडविणाऱ्यांनी व्यापून टाकली होती. सायंकाळी अंधार पडल्यावर अनेक हौसी मंडळींनी फटाक्यांची आतषबाजी केली.दिवसभर पतंगांनी व्यापलेले आकाश रात्री शोभीवंत फटाक्यांनी उजळून निघालेले होते. पतंग व मांजा खरेदी-विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली.
मांज्याचीदेखील मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. एक पतंगाची किंमत किमान पाच रुपयांची धरली तरी त्यातूनच लाखोची उलाढाल झाली. शिवाय दोरा, त्यापासून तयार करण्यात येणारा मांजा, चक्री यातूनदेखील लाखोंची उलाढाल झाली. त्यामुळे पतंग विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना यंदाची संक्रांत बऱ्यापैकी गेल्याचे चित्र होते. शनिवारी रात्रीपर्यंत तसेच रविवारी दुपारपर्यंत पतंग विक्रीचे दुकाने तसेच मांजा तयार करणाऱ्यांकडे गर्दी होती. दुपारी दोन वाजेनंतर दुकानांवर सामसूम दिसून आल्याचे चित्र होते.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
- यंदाच्या पतंगोत्सवात पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी असल्याचे दिसून आले. शिवाय पोलिसांची गस्ती वाहनेही नियमित फेऱ्या मारत होती. सगळ्याच चौकांमध्ये वाहतूक पोलीसही आज नागरिकांना दिसून आले.
- नायलॉन दोऱ्याच्या विक्रीवर बंदी असल्यामुळे असा दोरा कुठे विक्री तर होत नाही ना? याचीही चाचपणी केली जात होती.
विरोधाभास दर्शविणारचे चित्र
उंच इमारतींच्या गच्चीवर डिजेच्या तालावर शेकडो पतंग उडविणारे कुठे व एक एक पतंग गोळा करण्यासाठी रस्त्यावर धावणारे कुठे असे विरोधाभास निर्माण करणारे चित्रदेखील शहरात दिसून आले. काटलेली पतंग मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांची कसरत मोठी होती. कुणी लांब काठीला काटेरी झुडूप लावलेले तसेच कुणी मोठी काठी घेऊन झाडावर, घरांच्या गच्चीवर, विद्युत पोलवर अडकलेली पतंग काढत होते.