प्रकाशा येथे अवैध वाळू वाहतुकीचे चार डंपर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:45 PM2018-03-20T12:45:23+5:302018-03-20T12:45:23+5:30
महसूल विभागाची कारवाई : तीन पथकांची नेमणूक असताना राजरोस वाहतूक
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 20 : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे चार डंपर महसूल विभागाने जप्त केले आहेत. चालक-मालक संघटनेच्या पदाधिका:यांनी वाळूची वाहतूक होत असल्याचे महसूल विभागाच्या कर्मचा:यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार प्रकाशा गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले डंपर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, वाळूचा उपसा करणे, साठवणूक करण्यावर राज्य शासनाची बंदी आहे. या परिसरात वाळूचे ठेकेही देण्यात आलेले नाहीत. तरीही प्रकाशा येथून वाळूची बेसुमार वाहतूक केली जाते. ही वाळू येते कुठून याचा शोध घेणे गरजेचे आहे.
शासनाचे कडक धोरण असतानाही रात्री-अपरात्री वाळू वाहतूक होत आहे. महसूल विभागाने पथक नेमले असून मात्र या पथकाला ही वाहने दिसत नाहीत. चालक-मालक या संघटनेच्या पदाधिका:यांनी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने प्रकाशा हद्दीतून जात असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिले. रविवारी प्रकाशा येथे ज्या पथकाला नेमण्यात आले होते ते पथक नेमणुकीच्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे चालक-मालक संघटनेच्या पदाधिका:यांनी मंडळ अधिकारी बी.ओ. पाटील व तलाठी जिजाबराव पाटील यांच्याशी थेट संपर्क करून घटनास्थळी बोलावले. ते घटनास्थळी आल्यानंतर चारही वाळूने भरलेले डंपर (क्रमांक आर.जे.23 जीबी- 4697, आर.जे.23 जीबी-4698, आर.जे.24 जीए- 2277 व एम.एच.39 एडी- 0185) प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राच्या आवारात जमा करण्यात आले. या वाहनांची तपशीलवार माहिती घेऊन दंडात्मक कारवाई करण्याचा आग्रह या पदाधिका:यांनी धरला. त्यासोबतच गावालगत छोटूलाल पुरुषोत्तम पाटील यांच्या बिनशेती गट नं.98/1 या जागेत वाळूचा अवैध साठा असल्याचेही या पदाधिका:यांनी निदर्शनास आणून दिले. त्याठिकाणी शेकडो ब्रास वाळूचा साठा दिसून आला. शासनाच्या नवीन नियमानुसार वाळूचा साठा करणे गुन्हा आहे. त्यामुळे या साठय़ाबाबत लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. हा वाळू साठा एका खाजगी कंपनीने साठविल्याचे समजते.
गुजरात राज्यात वाळू उपसा करणे किंवा वाहतूक महसूल विभागाच्या आधीन राहून केली जाते. मात्र विविध क्लृप्त्या लढवून रात्रीच्यावेळी वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. महसूल विभागाने तीन पथकांची नेमणूक केलेली असताना अवैधपणे वाळूची वाहतूक का होते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, रविवारी रात्री वाळूने भरलेल्या जप्त केलेल्या चार डंपरवर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई होणार आहे.