खांडबारा येथे चार लाखांचा खतसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:05 PM2018-07-23T13:05:25+5:302018-07-23T13:05:33+5:30
तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार/खांडबारा : कृषी विभागाच्या पथकाने खांडबारा येथे शनिवारी रात्री धाड टाकून दोन ठिकाणाहून सुमारे चार लाख रुपये किंमतीचा खताचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती दगडू परदेशी, राहुल दगडू परदेशी, किरण सुरेश परदेशी सर्व रा.खांडबारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या युरियाची टंचाई आहे. अनेक ठिकाणी शेतकरी युरियासाठी रांगा लावत आहेत. असे असतांना खांडबारा येथे दोन कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विनापरवाना युरियाचा साठा केला. ही बाब कृषी विभागाचा दक्षता पथकाला कळाल्यावर खांडबारा येथे धाडी टाकण्यात आल्या. श्री कृषी सेवा केंद्राच्या उमरीपाडा येथील गोडावूनमध्ये सात हजाराचे मिश्र खते, साडेचार हजाराचे सिंगल सुपर फॉस्फेट व 42 हजार 500 रुपयांचे युरिया असे एकुण 54 हजार रुपयांच्या 185 गोण्या जप्त करण्यात आल्या.
याशिवाय शनिकृपा कृषी सेवा केंद्राच्या गोदामातून 15 हजार 960 रुपये किंमतीचा युरिया, एक लाख 89 हजार रुपये किंमतीचे मिश्र खत, 15 हजार 960 रुपये किंमतीचे इफको खत, नऊ हजार 800 रुपये किंमतीचे संयुक्त खत, 22 हजार 700 रुपयांचे मिश्र खत, 88 हजार रुपये किंमतीच मिश्र व 14 हजार 800 रुपये किंमतीचे पोटॅश खत असे एकुण तीन लाख 56 हजार 695 रुपये किंमतीच्या खतांच्या एकुण 516 गोण्या जप्त करण्यात आल्या.
याबाबत जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी अरुण तायडे यांनी फिर्याद दिल्याने भारती दगडू परदेशी, राहुल दगडू परदेशी, किरण सुरेश परदेशी सर्व रा.खांडबारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कृषी विभागाने केलेली आठवडय़ातील ही दुसरी कारवाई आहे.