मोलगी रस्ता दुरुस्तीला लागणार चार महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:58 PM2019-08-12T12:58:13+5:302019-08-12T12:58:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा ते मोलगी दरम्यानचा रस्ता संततधार पावसामुळे पूर्णपणे खचला असून हा रस्ता नव्याने तयार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा ते मोलगी दरम्यानचा रस्ता संततधार पावसामुळे पूर्णपणे खचला असून हा रस्ता नव्याने तयार होण्यास किमान चार महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आह़े तोवर मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे नियोजन आह़े
अतीवृष्टीमुळे सातपुडय़ातील दुर्गम भागाला जोडणा:या मोलगी-डाब -अक्कलकुवा रस्त्यावर जागोजागी दरडी तसेच डोंगरातून येणा:या पाण्यामुळे आठ पूल कोसळले आहेत़ यातून या मार्गावर वाहतूक होणेच शक्य नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून वाहतूक बंद आह़े देवगोई घाटात तीन स्लॅब ड्रेनेज पूर्णपणे कोसळल्याने मोठे भगदाड पडले आह़े मोलगी बाजूने सुरु असलेल्या रस्त्यावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती आह़े परंतू दरडींचा आकार हा मोठा असल्याने दरड उचचल्यानंतर रस्ता अधिक खचण्याची भिती व्यक्त करण्यात येत आह़े देवगोई घाटातील तब्बल तीन किलोमीटरचे अंतर पूर्णपणे निकामी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याला केंद्रशासनाच्या विशेष प्रकल्पांतर्गत 60 कोटी रुपयांचा निधी मिळाला आह़े परंतू त्याचे काम मात्र पावसामुळे पुढे ढकलण्यात आले होत़े लोकसभा निवडणूकांपूर्वी मिळालेला निधी वेळेत खर्च झाला असता, तर रस्ता सुस्थितीत राहिला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आह़े बांधकाम विभागाने रस्त्याचे तात्पुरते काम करुन दिल्यास ते पुन्हा कोसळण्याचे भिती असल्याने रस्ता चार महिने बंद राहण्याची शक्यता आह़े रस्ता बंद असल्याने मोलगीकडे जाणारी वाहने देवमोगरा मार्गाने जात आहेत़ तसेच अक्कलकुवा ते मोलगी वाहतूक तळोदा धडगाव मार्गानेही होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े
दुर्गम भागात नुकसान
तालुक्यातील जामली व बोखाडी परिसरातून वाहणा:या देवनदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेत जमिनीसह पिके वाहून गेल्याची माहिती देण्यात येत आह़े या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे अशी मागणी भांग्रापाणीच्या सरपंच इमाबाई भगतसिंग तडवी, उपसरपंच तुकाराम देहल्या वसावे, भरतसिंग आरशी तडवी, दाज्या नाहन्या तडवी, जलसिंग खाअल्या तडवी, आरशी रेवला तडवी यांच्यासह नुकसानग्रस्त शेतक:यांनी अक्कलकुवा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अककलकुवा-मोलगी रस्त्यावर आमलीबारी ते देवगोई घाटाच्या दरम्यान दोनगुलर येथील पुलासह सात पूल वाहून गेली आह़े रस्त्यावर जागोजागी दरड आणि गाळाचे ढिग आहेत़ पुराच्या पाण्यात रस्त्यावर झाडे वाहून आली आहेत़ बंद पडलेल्या रस्त्यावर डाब देवगोई ते आमलीबारी असा पायी प्रवास नागरिक करत आहेत़ आमलीबारी येथून वाहनाने ते अक्कलकुवा गाठत आहेत़ धडगाव किंवा देवमोगरा मार्गाने जाणे परवडणारे नसल्याने आदिवासींना नाईलाजास्तव पायी चालावे लागत आह़े दोनगुलर केटाघाट जवळ वाहून गेलेल्या पुलांवरुन अद्यापही पाणी वाहत असल्याने त्यातून मार्ग काढत नागरिक पायी चालत येत असल्याने दुर्घटनेची शक्यता आह़े