बसवरच्या दगडफेकीत चार विद्यार्थिनी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:17 PM2020-01-05T12:17:03+5:302020-01-05T12:17:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कलसाडी ता़ शहादा येथील बसथांब्यावर एसटी बस थांबवली नाही, याचा राग आल्याने तिघांनी थेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कलसाडी ता़ शहादा येथील बसथांब्यावर एसटी बस थांबवली नाही, याचा राग आल्याने तिघांनी थेट बसवर दगडफेक केली़ मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली होती़ यात चार विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत़
मंगळवारी कलमाडी ता़शहादा येथून विद्यार्थिनी व प्रवासी घेऊन एमएच १४ बीटी १८६८ ही बस सकाळी १० वाजता शहाद्याकडे जात असताना कलसाडी गावाच्या थांब्यापेक्षा काही अंतर पुढे गेली़ यावेळी थांब्यावर उभ्या असलेल्या काहींनी बस थांबवण्याची सूचना केली़ चालकाने बस काही अंतर पुढे थांबवल्यानंतर चालक किशोरकुमार वामनराव ठाकूर रा़ शहादा याच्यासोबत दोघा-तिघांनी हुज्जत घालत मागच्या बाजूने बसवर थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली़ यात बसच्या मागील भागातील काचा फूटून अंजली आसाराम कोळी, वैशाली जागो कोळी, गायत्री मनोहर पाटील, सेजल युवराज पाटील सर्व सोनवल ता़ शहादा या चारही विद्याथिनी जखमी झाल्या़ त्यांना काचा लागल्याने हातांसह चेहऱ्यावर जखमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ घटनेमुळे बसमधील प्रवाशांसह विद्यार्थिनी पूर्णपणे घाबरल्या होत्या़
बसचालक किशोरकुमार ठाकूर यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित गणेश गोपाळ कोळी, गणेश राजू धनगर रा़ कलसाडी व आणखी एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक संदीप लांडगे करत आहेत़