प्लॉट खरेदीत सात लाखाची फसवणूक, नंदुरबारातील चौघांविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: February 9, 2024 05:22 PM2024-02-09T17:22:34+5:302024-02-09T17:23:18+5:30
सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबारातील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज शेलार, नंदुरबार : प्लॉट खरेदीच्या व्यवहारात सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबारातील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविदास खंडू नेरकर (६०), सुनिता देविदास नेरकर (५०)रा.रुपमनगर, नंदुरबार, सर्यकांत रामदास आगळे (४५), राहुल राजधर निकम (३६) रा.तुलसीनगर, नंदुरबार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनुसार, महेंद्रभाई मंगाभाई चौधरी (६०) यांनी २०१७ मध्ये नेरकर यांच्याकडून प्लाॅट खरेदी करण्यासाठी वेळोवेळी त्यांना एकुण सात लाख रुपये दिले. परंतु त्यांनी प्लॉट खरेदी करून दिला नाही.
त्या बदल्यात त्यांनी सात लाख रुपयांचा चेक दिला असता त्यावर खोटी सही करून व बारकोड नसलेला दिला. त्यामुळे चेक वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महेंद्रभाई चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सागर आहेर करीत आहे.