मॉडेल स्कूल मंजूर करून देण्याच्या बहाण्याने ६५ लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:24+5:302021-09-11T04:30:24+5:30
नंदुरबार : मॉडेल स्कूलची परवानगी आणून देतो म्हणून धुळे येथील दोघांसह नाशिक येथील एकाने ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची ...
नंदुरबार : मॉडेल स्कूलची परवानगी आणून देतो म्हणून धुळे येथील दोघांसह नाशिक येथील एकाने ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कुढावद येथील एकाने दिली आहे. याबाबत म्हसावद पोलिसात तिघांविरुद्ध फसवुणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बन्सीलाल सखाराम सोनवणे, अमोल बन्सीलाल सोनवणे (रा. श्रीराम कॉलनी, वाडीभोकररोड, धुळे) व दीपक तुकाराम देवरे (रा. महादेव हौसिंग सोसायटी, त्रिमुत्री चौक, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अशोक हिरालाल पाटील (रा. कुढावद, ता. शहादा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २०१३मध्ये सोनवणे पित्रा-पुत्र व दिल्ली येथे मानव विकास मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करणारा दीपक देवरे यांनी अशोक पाटील यांना दिल्ली येथून मॉडेल स्कूल मंजूर करून आणतो म्हणून त्यांच्याकडून ६५ लाख रुपये घेतले. परंतु स्कूल मंजूर झाले नसल्याने अशोक पाटील यांनी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु पैसे परत न देता शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी तिघांनी दिली. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यावर अशोक पाटील यांनी म्हसावद पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध म्हसावद पोलिसात फसवणुकीचा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे तपास करीत आहेत.