लॉकडाऊन काळात गरीबांना मोफत धान्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:02 PM2020-10-06T12:02:43+5:302020-10-06T12:02:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत केंद्र शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा प्रती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत केंद्र शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात शहादा तालुक्यात गहू, तांदूळ, तूरदाळ व चनाडाळ मिळून ९१ हजार ७१० क्विंटल १८ किलो धान्याचे वितरण झाले. या धान्यामुळे कोरोना संसर्गाच्या संकटकाळात हाताला काम नसलेल्या रोजंदारी मजुरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होऊ शकला.
यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कधी नव्हे एवढे नागरिकांचे हाल झाले. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा देशात संसर्ग झाला आणि वैश्विक महामारीचे सावट संपूर्ण देशभर पसरले. या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने देशभर लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे सर्व कामे बंद झाली. उद्योगधंदे बंद झाले. यात रोजंदारी मजुरांचे हाल खूपच झाले. तब्बल तीन महिने त्यांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी सरकारला पिवळे रेशन कार्डधारक, केशरी कार्डधारकांनाही स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्याचे वितरण करावे लागले. शहादा तालुक्यात दररोज मजुरी करून त्यावर गुजराण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेत कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकलला.
शहादा तालुक्यात एकूण अंत्योदय योजनेचे लाभार्थी २१ हजार ५६३ कार्डधारक आहेत. तसेच प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी ४६ हजार २४१ कार्डधारक आहेत. त्यांना एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत स्वस्त धान्य दुकानातून ७० हजार ४५८ क्विंटल ५७ किलो तांदूळ तसेच जुलै ते सप्टेंबर महिन्यात १८ हजार २२६ क्विंटल २६ किलो गहू व एप्रिल ते जून महिन्यात ७३४ क्विंटल ६१ किलो तूरडाळ तसेच एप्रिल ते आॅगस्ट महिन्यात दोन हजार २९० क्विंटल ७४ किलो चनाडाळ मोफत वाटप करण्यात आली.
केशरी कार्डधारकांनाही लाभ
शहादा तालुक्यातील २० हजार १०० केशरी कार्डधारकांना देखील जून व जुलै या महिन्यात दोन हजार ३४२ क्विंटल १८ किलो तांदूळ १२ रुपये किलो दराने तसेच जून व जुलै महिन्यात तीन हजार ४५४ क्विंटल गहू स्वस्त आठ रुपये किलो दराने वाटप करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात केशरी कार्डधारकांनाही जून आणि जुलै महिन्यासाठी स्वस्त दरात राज्य शासनाने रेशनवरून धान्य उपलब्ध करून दिले होते. हा निर्णय दोन महिन्यासाठीच होता. त्याची मुदत संपली आहे. सध्या लॉकडाऊन सुरूच आहे. ते आणखी किती दिवस सुरू राहील याचा अंदाज नाही त्यामुळे राज्य शासन आणखी काही महिने मुदतवाढ देईल याची केशरी कार्डधारकांना प्रतीक्षा आहे.