शहादा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:51 PM2018-06-20T12:51:31+5:302018-06-20T12:51:31+5:30
लोकसंघर्ष मोर्चा : पाच तास ठिय्या आंदोलन, वनअधिकार कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी
शहादा : धडगाव तालुक्यातील वनअधिकार कायद्यातील जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, 73 वनगावे तात्काळ महसूली करण्यात यावीत यासह विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मागण्या मान्य होईर्पयत या कार्यालयावर पाच तास ठिय्या आदोलन करण्यात आले. अखेर सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्यांचा तात्काळ निपटारा करण्याचे लेखी पत्र प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या सहीनिशी आदोलकांना देण्यात आले.
शहादा प्रांताधकारी कार्यालयावर प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदोलकांचा वनअधिकार कायद्याची जनपक्षीय अमंलबजावणी होण्यासाठी मोर्चा नेण्यात आला. शहरातील मार्केट यार्डपासून मोर्चाला सुरुवात होऊन बसस्थानक, डोंगरगाव रोड, पटेल रेसीडेन्सी चौकमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. त्याठिकाणी घेराव घालत विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी प्रतिभा शिंदे यांनी मोर्चेक:यांना मार्गदर्शन केले.
धडगाव तालुक्यातील 73 वनगावे महसुली करण्यात यावीत, वनजमीनधारकांचे अंशत: मंजूर केलेले पट्टे सर्व दावेदारांना पूर्णत: मंजूर करून तसा सातबारा उतारा तात्काळ देण्यात यावा, पाच हजार वनदावे प्रक्रियेमध्ये घ्यावेत, देवघरे समितीची यादी वनअधिकार समितींना उपलब्ध करून द्यावी. दावे मंजूर झालेल्या वनजमीन धारकांचे सपाटीकरण व बागायती करणे या योजना लागू कराव्यात, त्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, लेगापाणी ते गोरांबा व बिजरी-सिरसानी ते बोदला या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील निकृष्ट रस्ता कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी आदी मागण्या मंजूर झाल्याशिवाय न उठण्याचा निर्धार आदोलंकानी केला. त्यांनी सुमारे पाच तास या कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
या वेळी झालेल्या बैठकीस शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, धडगावचे तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, वनक्षेत्रपाल अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी गावीत, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी, धडगाव व शहाद्याचे कृषी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक संजय शुक्ल व सहका:यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.