नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य अधांतरी!

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: June 14, 2018 12:09 PM2018-06-14T12:09:06+5:302018-06-14T12:09:06+5:30

Future of Nandurbar Medical College final! | नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य अधांतरी!

नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य अधांतरी!

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न यंदाही रेंगाळला आहे. आघाडी शासनाच्या काळात अर्थात पाच वर्षापूर्वी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दूरदृष्टी ठेवून नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आणले होते. परंतु विविध कारणांनी ते रेंगाळले. भाजप सरकारच्या काळात पुन्हा त्याला उभारी मिळाली, विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबारात त्याची घोषणा केली, परंतु पुढे फारशा हालचाली झाल्या नाहीत. परिणामी केंद्र शासनाने मंजुरी नाकारली आहे. पुढे आणखी काय घडामडी होतात, महाविद्यालय येथे सुरू होते किंवा नाही याकडे आता लक्ष लागून आहे. 
नंदुरबारात विविध उच्च शिक्षणाची सोय होत आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी महाविद्यालय येथे सुरू झाले आहे. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये विविध विषयांचे अभ्यासक्रमांची सोय आहे.  राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा देखील नंदुरबारातच सुरू झाली आहे. त्यातच आता वैद्यकीय महाविद्यालयाची भर पडणार होती. त्यामुळे आदिवासी भागात वैद्यकीय शिक्षणाच्या सोयीसह आरोग्य सेवा देखील सुधारली असती. परंतु पाठपुरावा आणि तांत्रिक बाबीच्या अडचणींमुळे गेल्या सहा वर्षात येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर होऊनही सुरू होऊ शकले नाही.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले किमान 500 बेडच्या रुग्णालयाची नंदुरबारात वाणवा आहे. सध्या जिल्हा रुग्णालय 250 बेडचे आहे. नव्याने मंजुर झालेले महिला रुग्णालय 100 बेडचे राहणार आहे. नुकतीच मंजुरी मिळालेल्या आयुष रुग्णालयात देखील 50 बेड राहणार आहेत. तरीही 100 बेडची कमतरता राहते. वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत 100 बेडचे रुग्णालय सुरू करून 500 बेडची क्षमता पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून जिल्हा रुग्णलयाच्या आवारात नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचे कार्यालय देखील सुरू करण्यात आले होते. परंतु या कार्यालयात अभावानेच कुणी अधिकारी दिसून आले. केवळ नावालाच हे कार्यालय येथे सुरू होते. पुर्णवेळ अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत आवश्यक त्या बाबींची पुर्तता करून घेतली असती तर महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला असता. जिल्हा रुग्णालय संबधित विभागाकडे हस्तांतराची प्रक्रिया देखील केली गेली नव्हती. शिवाय महाविद्यालयासाठीच्या जागेच्या निश्चितीबाबत देखील फारशी उत्सूकता दाखविली गेली नाही. त्यामुळे तेंव्हाच वैद्यकीय महाविद्यालयाच्या भविष्याबाबत शंका निर्माण झाली होती. शिवाय या महाविद्यालयाच्या पाठपुराव्यासाठी जिल्ह्यातील मंत्री राहिले असते तर त्यात आणखी भर पडली असती. आघाडी शासनाच्या काळात मंत्रीपदी असतांना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी अनेक बाबींची पुर्तता करून घेतली होती. शिवाय नियमित पाठपुरावा देखील होता. परंतु भाजप शासनाच्या काळात जिल्ह्याला मंत्रीपदच नसल्यामुळे त्याचा तोटा सहन करावा लागल्याचे चित्र आहे. नंदुरबारात आयोजित महाआरोग्य मेळाव्यात मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी खान्देशात दोन अर्थात जळगाव आणि नंदुरबार हे दोन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याची घोषणा केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात सर्व प्रक्रिया पुर्ण करून यंदापासून महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आहे.
जिल्ह्यातील विशेषत: दुर्गम भागातील आरोग्य सेवेची स्थिती पहाता वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज होती. या माध्यमातून स्थानिक ठिकाणीच उपचार आणि संदर्भ सेवा देखील मिळाल्या असत्या. आता तरी यापुढे वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी पाऊल उचलावे, शासन स्तरावर पाठपुरावा कायम ठेवावा अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Future of Nandurbar Medical College final!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.