राजरंग- ये राजनितीका खेल है किसी के समझमे नही आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:33 PM2020-12-06T12:33:47+5:302020-12-06T12:33:54+5:30

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाचा नवा ...

This is a game of politics, no one understands ... | राजरंग- ये राजनितीका खेल है किसी के समझमे नही आता...

राजरंग- ये राजनितीका खेल है किसी के समझमे नही आता...

Next

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाचा नवा चेहरा समोर आला. अर्थात नंदुरबार जिल्ह्यासाठी हे नवीन नाही. कारण प्रत्येक निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे वेगवेगळी असतात. पक्षाला फारसे महत्त्व नाही. व्यक्तीगत हितसंबंध आणि अंतर्गत वेगवेगळ्या माध्यमातून असलेले संबंध हे त्या त्या वेळी प्रत्येक नेत्याची भूमिका ठरवीत असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी पक्षीय नेत्यांची भूमिका वेगळी असते. विधानसभेच्यावेळी ती काही बदलते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ती अजून वेगळी पहावयास मिळते. हेच चित्र या निवडणुकीतही पहायला मिळाले.
अमरिशभाई पटेल यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. म्हणून याठिकाणी पोटनिवडणूक झाली. ज्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला त्यावेळी या निवडणुकीसाठी केवळ २३ महिने शिल्लक होते. त्यामुळे अल्प काळासाठी होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना फारशी चुरस दिसून आली नाही. उमेदवारीसाठी कुणी पुढे येत नाही हे पाहून युवा नेता अभिजित पाटील यांनी आपले भाग्य आजमावण्यासाठी पुढाकार घेतला. अर्थातच या मतदारसंघातील राजकीय चित्र व अमरिशभाई पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्याच्या दोन्ही जिल्ह्यात असलेले राजकीय हितसंबंध पाहता ही निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी वाटत होती. अर्ज भरण्याच्या वेळी अभिजित पाटील यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते होते. त्यामुळे जर का महाविकास आघाडीचे सर्व नेते खरच संपूर्ण शक्तीनिशी एकत्र आले तर अभिजित पाटील हे चुरस देतील की काय? अशीही स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निवडणुकीबाबत काहीशी उत्सुकताही होती. पण लॉकडाऊनमुळे निवडणूक पुढे ढकलली. या आठ महिन्यांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जेव्हा निवडणुकीची स्थगिती उठवून पुढील कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा मात्र या निवडणुकीबाबत फारशी उत्सुकता राहिली नव्हती. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व शिवसेनेचे नेते या तिघांनी संयुक्तपणे जेव्हा पत्र काढून अभिजित पाटील यांच्या विजयाचे आवाहन केले तेव्हा पुन्हा लोकांमध्ये काहीशी उत्सुकता वाढली. पण हे पत्रदेखील केवळ सोशल मिडीयापुरतेच मर्यादित राहिले. महाविकास आघाडीचे नेते कधीही एकत्र येताना दिसले नाहीत. त्यामुळे साहजिकच निकालात कुणाला किती मते पडणार? अमरिशभाई किती मतांनी विजयी होणार? एवढीच उत्सुकता लागून होती.
निकालानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी अतिशय सावध आणि सूचक प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, महाविकास आघाडी अर्थात तीन पक्षांच्या आघाडीच्या संसाराची ही सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या तिन्ही पक्षात घनिष्ठ संबंध व समन्वयात काहीशी त्रुटी जरुर आहे. पण पुढील काळात मात्र तिन्ही पक्षांना एकजुटीने एकत्र यावे लागेल. त्यांच्या या प्रतिक्रीयेने आगामी काळात महाविकास आघाडी खरोखरच एकजुटीने एकत्र येईल का? याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल. पण सध्याची जिल्ह्याची राजकीय स्थितीदेखील विरोधाभास निर्माण करणारी आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील २०० मतांपैकी १३० मते महाविकास आघाडीकडे होती तर भाजपकडे मात्र ७० मते होती. पण आतील चित्र पाहता नंदुरबार पालिकेची सत्ता शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे आहे. त्यांचे पालिकेतील सदस्य अद्याप तरी पक्षीय पातळीवर काँग्रेसमध्येच आहेत. तसेच चित्र शहादा पालिकेचेही सांगता येईल. कारण येथे अभिजित पाटील यांचे वडील मोतीलाल पाटील हे नगराध्यक्ष असून ते भाजपकडून विजयी झाले आहेत. तेथे त्यांच्या गटातील नगरसेवक हेदेखील भाजपकडूनच विजयी झाले आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नगरसेवक भाजपचे नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पालिकेत भाजप आणि महाविकास आघाडीचे समीकरण पक्षीय पातळीवर मांडता येणार नाही. असेच चित्र थोड्याफार प्रमाणात इतर ठिकाणीदेखील आहे. जिल्हा परिषदेचे काही सदस्य आघाडीच्या गटातून विजयी झाले असले तरी त्यांचे समर्थन इतर काळात उघडपणे भाजपसोबत आहे. ही स्थिती पाहता पक्षीय समीकरणाची सांगड ठोसपणे मांडणे अवघडच आहे. केवळ या निवडणुकीतच नाही तर आगामी दोन वर्षापर्यंत असेच गुंतागुंतीचे राजकारण जिल्ह्यात पहायला मिळणार आहे. परिणामी पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणालाच जिल्ह्यात महत्त्व आले आहे.

Web Title: This is a game of politics, no one understands ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.