रिमझिम पावसातच गणरायाचे स्वागत, जिल्ह्यात ४५० पेक्षा अधिक मंडळे, मिरवणुकांऐवजी परस्पर मूर्ती नेऊन केली स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:44+5:302021-09-11T04:30:44+5:30
रिमझिम पाऊस शुक्रवारी सकाळपासूनच नंदुरबारसह परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. अशा वातावरणातच बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडळांमध्ये घेऊन ...
रिमझिम पाऊस
शुक्रवारी सकाळपासूनच नंदुरबारसह परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. अशा वातावरणातच बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडळांमध्ये घेऊन जाण्यासाठी लबगब दिसून येत होती. संजय टाऊन हॉल ते दीनदयाल चौक यादरम्यान मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत गर्दी कायम होती. त्यामुळे या भागात वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले होते. पावसामुळे अनेकजणांनी चारचाकी वाहन आणल्यामुळे त्यात रहदारी विस्कळीतपणामध्ये भरच पडत होती. कधी पाऊस तर कधी कडक ऊन असे श्रावण महिन्यातील वातावरण शुक्रवारी अनुभवयास मिळत होते.
गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक विक्री
यंदाही चार फूट गणेशमूर्तीची मर्यादा कायम होती. या उंचीच्या मर्यादेत हजारो मूर्तींची विक्री झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या मूर्तींसह बाहेरून आणलेल्या मूर्तींचीदेखील मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यातून लाखोंची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तीविक्रीतून चांगली उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पीओपीसह शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तींनादेखील यंदा मागणी होती. शाडू मातीच्या मूर्ती मात्र यंदा काही प्रमाणात महाग होत्या. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींनाच पसंती असल्याचे चित्र यंदाही दिसून आले.
मानाचे गणपती
नंदुरबारातील मानाचे गणपती म्हणून ओळख असलेल्या दादा, बाबासह इतर सात गणेश मंडळाच्या गणेशमूर्तींची विधिवत स्थापना करण्यात आली. दादा व बाबा गणपतींसह इतर गणेश मानाचे गणपतींच्या मूर्ती या स्थानिक ठिकाणीच कार्यकर्ते तयार करीत असतात. या दोन्ही गणपतींच्या स्थापना ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असून, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी विशेष दक्षतादेखील घेतली जात आहे.
मिरवणुकांविना स्थापना
यंदा स्थापना आणि विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी आहे. त्यामुळे अनेक मंडळे, तालीम संघ यांनी परस्पर मूर्ती घेऊन जाऊन मूर्तीची स्थापना केली. यामुळे ढोल, ताशे, डीजे यांचा कुठेही गजर ऐकण्यास मिळाला नाही. नंदुरबारात गणेश स्थापनेसाठी अनेक तालीम संघ मोठ्या मिरवणुका काढत असतात. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणुका सुरू राहत असतात. यंदा मिरवणुकांवर बंदी असल्याने ते चित्र कुठेही पाहावयास मिळाले नाही.