कोरोनामुळे गणेशोत्सवाला मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:24 PM2020-07-24T12:24:34+5:302020-07-24T12:24:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा गणेशोत्सवाला अनेक मर्यादा येणार आहेत. याबाबतचे मार्गदर्शक तत्वे आणि सुचना एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा गणेशोत्सवाला अनेक मर्यादा येणार आहेत. याबाबतचे मार्गदर्शक तत्वे आणि सुचना एका अध्यादेशाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या आहेत. त्यानुसार स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीवर मर्यादा राहणार आहे. सार्वजनिक मंडळांना मूर्ती किमान चार फूट आणावी लागणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी राहणार आहे.
नंदुरबारचा गणेशोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्ताने आतापासूनच चैतन्य आणि उत्साह सुरू झाला असला तरी कोरोनाचा कहर असल्यामुळे उत्सवाला मर्यादा येणार आहेत. आधीच सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे उत्सव साजरा करतांना प्रशासनाने अनेक मर्यादा घालून दिल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी अध्यादेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, गणेशोत्सवाची मंडळांनी पालिका व स्थानिक प्रशासनाची धोरणानुसार परवाणगी घेणे आवश्यक आहे. न्यायालयीन आदेश व प्रशासनाच्या निश्चित धोरणानुसार गणेश मूर्ती स्थापनेसाठी मर्यादीत स्वरूपात मंडप उभारण्यात यावा. सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना जास्तीत जास्त प्रमाणात सजावट नसावी. श्रींची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी चार फूटाच्या मर्यादेत असावी. शक्यतोवर पारंपारिक गणेश मूर्तीऐवजी धातू किंवा संगमरवर मूर्तीचे पूजन करावे. शाडूमातीची मूर्ती असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत गर्दी टाळावी. वर्गणी किंवा देणगी स्वच्छेने दिली तरच स्विकारावी.
गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक व कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांवर प्रतिबंधात्मक उपक्रम राबवावे. दर्शनाची सुविधा आॅनलाईन किंवा सोशल मिडियाद्वारे उपलब्ध करून द्यावी. गणपती मंडळात थर्मल स्कॅनिंगसह पर्यायी व्यवस्था असावी. विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनस्थळी होणारी आरती आधीच अर्थात घरीच किंवा मंडळातच करून घ्यावी. स्थानिक संस्थांनी मूर्ती विसर्जनासाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करावी. सोशल डिस्टन्सिंगच्या पालनासह गणेशोत्सावासाठी लागू असलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करावी अशा सुचना देखील या आदेशात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिल्या आहेत. सार्वजनिक उत्सवात गर्दी टाळून कोरोनाचा फैलाव रोखणे हा उद्देश प्रशासनाचा आहे. परंतु उत्सव साजरा करू नये असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे गणेशमूर्ती स्थापन करता येईल, दहा दिवस उत्सवही साजरा करता येईल परंतु केवळ प्रत्येकाने सामाजिक स्थिती, सध्याची आरोग्याची स्थिती याचे आत्मभान राखणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उत्सवाच्या तयारीकडे लक्ष लागून आहे.