केरोसिनऐवजी गॅस जोडणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:49 PM2017-10-29T12:49:50+5:302017-10-29T12:49:50+5:30
आढावा बैठक : धान्य पोहचविण्यासाठी वेगळी यंत्रणा, पालकमंत्र्यांच्या सुचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतिदुर्गम भागातील आदिवासींर्पयत धान्य वेळेत पोहोचेल असे नियोजन करावे. केरोसिनऐवजी थेट गॅस जोडणी देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात शनिवारी दुपारी विविध शासकीय समित्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री रावल बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले, दक्षता समितीची बैठक नियमितपणे आयोजित करीत पुरवठा विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात यावा. केरोसिन ऐवजी गॅस जोडणी देता येईल का याची तपासणी करावी. जिल्ह्यातील धान्य गोदामांची कामे 26 जानेवारी 2018 पूर्वी पूर्ण करावीत. त्यासाठी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमितपणे आढावा घ्यावा. कमी भावाने शेतमाल खरेदी करणा:या व्यापा:यांवर कारवाई करावी.
रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक जॉबकार्ड धारकास मिळतील, असे नियोजन करावे. रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शासकीय अधिकारी व कर्मचा:यांनी सोशल मिडियाचा अधिकाधिक वापर करीत शासकीय योजनांची माहिती जनतेर्पयत पोहोचविली पाहिजे, असेही पालकमंत्री रावल यांनी नमूद केले. उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत माहिती दिली.
दिव्यांगांसाठी असलेला निधी संबंधित विभागांनी वेळेत खर्च केला पाहिजे. त्यासाठी नियोजन करावे, असेही पालकमंत्री रावल यांनी सांगितले. या वेळी खनिकर्म, पुरवठा विभाग, नरेगा समिती, अपंग निधी खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले.
या वेळी विविध समित्यांवर नियुक्ती समिती सदस्य अशासकीय सदस्य उपस्थित होते.
भक्त निवासाचे भुमिपूजन
पालकमंत्री रावल यांच्या हस्ते पर्यटनक्षेत्र विकास अंतर्गत इमाम बादशाह दर्गा परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात भाविकांसाठी पाय:या, संरक्षक भिंत, सभामंडपाचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी 50 लाख रुपयांचा खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. भूमिपूजन सोहळ्यास आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरीष चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ.ल. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिराच्या सभामंडप, पारायण सभागृह व भक्तनिवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी दोन हॉल, स्वतंत्र शौचालय बांधण्यात येणार आहे. या कामासाठी एक कोटी आठ लाख रुपयांचा खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.