गावीत व पाडवी यांच्या अर्जावरील हरकती फेटाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:07 PM2019-10-06T12:07:56+5:302019-10-06T12:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. परंतु दोन्ही हरकती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. परंतु दोन्ही हरकती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लावल्या. उदेसिंग पाडवी यांनी ऑफीस ऑफ प्रॉफिटची माहिती लपविली तर विजयकुमार गावीत यांच्या अर्जातील एक रकाना कोरा असल्यावर हरकत नोंद झाली होती.
काँग्रेसचे उमेदवार उदेसिंग पाडवी हे बाजार समितीत संचालक आहेत. तेथील मानधन ते घेतात, परंतु त्याचा उल्लेख अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला नसल्यामुळे ती बाब ऑफीस ऑफ प्रॉफिटअंतर्गत येते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात यावा असा अर्ज भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांनी दिला होता. तर आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात एक रकाना कोरा सोडला होता. त्यावर काँग्रेस उमेदवार उदेसिंग पाडवी यांनी हरकत घेतली होती. दोन्ही हरकतींवर दुपारी तीन वाजता सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकुण दोन्ही हरकती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील यांनी फेटाळून लावल्या.
सुनावणीच्या वेळी तहसील कार्यालय आवारात खासदार डॉ.हिना गावीत, काँग्रेसचे अॅड.के.सी.पाडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.