हे गणराया, खड्डेयुक्त रस्त्यांच्या शापातून मुक्ती दे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:38 PM2019-09-02T12:38:33+5:302019-09-02T12:38:39+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकही रस्ता सध्या आरामदायी प्रवास होऊ शकेल असा नाही. अनेक ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील एकही रस्ता सध्या आरामदायी प्रवास होऊ शकेल असा नाही. अनेक रस्त्यांची अवस्था तर ‘रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता’ अशी झाली आहे. दुसरीकडे ज्या रस्त्यांचे नवीन कामे सुरू आहेत ती केवळ खोदून महिनोनमहिने संथ गतीने कामे सुरू आहेत. जणू लोकांना त्रास देण्यासाठीच नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली अशी अवस्था जनमानसात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची बांधकाम विभागाबाबत प्रचंड चीड आली असून यंदा गणरायाचे स्वागत करताना खड्डय़ाच्या रस्त्यांच्या शापातून मुक्ती दे हीच जनतेची प्रार्थना आहे.
नंदुरबार जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी 10 हजार कोटीपेक्षा अधिक खर्चाच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. या कामांच्या शुभारंभप्रसंगी नेत्यांनी देशातील सर्वात चांगले रस्ते नंदुरबार जिल्ह्यात होत असल्याचा गवगवा केला होता. मात्र या रस्त्यांची कामे इतकी संथगतीने आणि रस्त्यांवरुन सुरू असलेल्या वाहनधारकांची पर्वा न करता सुरू होती. एकीकडे रस्त्यांची कामे सुरू असताना दुसरीकडे पर्यायी रस्ता योग्य पद्धतीने न केल्याने वर्षभर जनतेने प्रचंड हाल सोसले. किमान नवीन रस्ते झाल्यानंतर चांगल्या रस्त्यावरुन प्रवास करता येईल हीच भावना होती. पण पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्यांच्या कामाचा दर्जाही किती निकृष्ट असल्याचे समोर आले. नवीन करण्यात आलेल्या रस्त्यांपैकी काही ठिकाणचे रस्ते खचले, काही ठिकाणी भराव वाहून गेला, काही ठिकाणी खड्डे झाले, सिमेंट उखडले असे विविध प्रकार पहायला मिळतात. शिवाय काही तांत्रिक अडचणीमुळे ठिकठिकाणी रस्त्यांची कामे झाली नसल्याने आणि त्याठिकाणी पर्यायी रस्ताही चांगला न करण्यात आल्याने वाहतुकीची गैरसोय आहेच.
एकीकडे नवीन रस्त्यांच्या कामाची ही अवस्था असताना यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जोडणा:या सर्वच रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. एकही रस्ता चांगला राहिला नाही. काही ठिकाणी फरशी वाहून गेल्या, काही ठिकाणी रस्ता वाहून गेला तर बहुतेक रस्ते पूर्ण खड्डय़ांचेच झाले आहेत. बांधकाम विभागाला अतिवृष्टीचे आयते निमित्त मिळाले आहे. या अतिवृष्टीने जणू निकृष्ट काम करणा:यांचे पाप धुतले आहे. पण त्यामुळे लोकांच्या ज्या हालअपेष्टा होत आहेत त्याकडे मात्र गांभीर्याने लक्ष घालायला कुणालाही वेळ नाही. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमुळे शहादा ते नंदुरबार रस्ता दुरुस्तीचे काम झाले. पण दुर्दैव जेव्हा मुख्यमंत्र्यांचा शहादा दौरा रद्द झाला आणि ते नंदुरबार-शहादा प्रवास करणार नाहीत ही बाब समोर येताच दुरुस्तीचे काम अर्धवटच सोडल्याचे लोकांनी पाहिले. यावरुनच सामान्य जनतेबाबत प्रशासन किती संवेदनशील आहे याची प्रचिती येते.
खड्डय़ांच्या रस्त्यांमुळे रोज अपघातांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील अॅक्सीडेंट हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या गेल्या महिना दोन महिन्यात प्रचंड वाढली आहे. खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात काहींचा बळीही गेला आहे. होळ ते कोपर्ली या रस्त्यावर कालच रात्री खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला. अशा कित्येक घटना गेल्या महिनाभरात घडल्या आहेत. रोज ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी जाणा:या विद्याथ्र्याचे प्रचंड हाल होत आहेत. खड्डय़ांच्या रस्त्यामुळे प्रवासाची वेळही दीड ते दोनपट झाली आहे. त:हाडी, ता.शहादा येथील ग्रामस्थ तर आपल्या अवतीभोवती असलेल्या रस्त्यांना इतके त्रासले आहेत की त्यांनी रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागातील अवस्था तर इतकी भयानक आहे की त्यांना या रस्त्यांचा आता कुठलाही उपयोग होत नाही. वाहनेच बंद झाल्याने तेथील आदिवासींना पूर्वीप्रमाणेच पायपीट करावी लागत आहे.
रस्त्यांच्या इतक्या पीडा आणि वेदना जनता सहन करीत असताना प्रशासन मात्र सुस्त आहे. त्यामुळे जिल्हाधिका:यांनीच आता पुढाकार घेऊन किमान बांधकाम विभागाला जागे करत रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी आणि लोकांचा त्रास कमी करावा, अशी अपेक्षा आहे. सोमवारी गणरायाचे आगमन होत आहे. त्यासाठी जिल्हाभर गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने किमान यावर्षी तरी पाण्याचा प्रश्न सुटणार असला तरी खड्डेयुक्त रस्त्यांमुळे जनता त्रासली आहे. त्यामुळे यंदा गणरायाकडे या शापातून मुक्ती मिळावी, अशीच मागणी आहे.